कृषिकर्ज घोटाळ्यात दोषींना कडक शासन: पंतप्रधान

नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या कर्ज माफी प्रकरणी गैरव्यवहार झाल्याच्या कॅगच्या अहवालात तथ्य आढळल्यास दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल; अशी ग्वाही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली.

शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याच्या सुमारे ५२ हजार कोटीच्या योजनेत अपात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली; अनेकांची कृषी कर्ज वगळून इतर बाबींसाठी घेतलेली कर्ज बेकायदेशीररित्या माफ करण्यात आली आणि बेण्कन अवाजवी पैसे देण्यात आल्याचे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल मंगळवारी संसदेत सादर करण्यात आला. या अहवालावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्यामुळे संसदेचे कामकाजही तहकूब करावे लागले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत सुमारे १० हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला. पात्र असलेले २४ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले; तर ३४ लाख अपात्र शेतकऱ्यांना माफी देण्यात आली; असा आरोप भाजप प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी केला.

Leave a Comment