न्यूयॉर्क: एड्सला कारणीभूत असणार्या एचआयव्ही संसर्ग झालेल्या बालिकेवर पहिल्यांदाच यशस्वी उपचार करण्यात आल्याची घोषणा डॉक्टरांनी केली. यामुळे एचआयव्ही संसर्गला बळी पडणार्या बालकांवरील उपचाराला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. अवघ्या जगाला भेडसाविणार्या एचआयव्ही संसर्गावर उपाय शोधणार्या शास्त्रज्ञांना प्रथमच मोठे यश मिळाले आहे. या बालिकेला अपल्या आईकडून एचआयव्हीचा संसर्ग झाला होता.
सन २०१० मध्ये या बालिकेच्या आईने मुदतपूर्व प्रसूतीतून या बालिकेला जन्म दिला होता. तिने आपल्या गर्भारपणाच्या काळात डॉक्टरांकडून तपासणी केली नव्हती. त्यामुळे बालकाच्या एचआयव्ही संसर्गाबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. मात्र हा धोका लक्षात येताच डॉक्टरांनी बालिकेवर तत्काळ उपचार सुरू केले. मिसिसिपी येथे जन्मलेल्या या बालिकेला एचआयव्ही संसर्ग झाल्याचे निष्पन्न होताच तिच्यावर जन्माच्या अवघ्या ३० तासांच्या आत झिडोवुडाईन, लॅमिवुडाईन, नर्व्हिपाईन ही विषाणूविरोधी औषधे देण्यास सुरुवात करण्यात आली.
अगदी योग्य वेळेत हे उपचार करण्यात आल्याने या घातक आजाराच्या विषाणूला तिच्या शरीराबाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. या औषधांचा परिणाम इतरही अशाच बालकांवर दिसल्यास जागतिक पातळीवर या औषधांची शिफारस केली जाऊ शकते. सन २०११ मध्ये सुमारे तीन लाख ३० हजार बालकांना एचआयव्हीची लागण झाल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केले होते. सध्या हा आकडा तीस लाखांवर गेल्याचा अंदाज आहे.
यापूर्वी टिमोथी ब्रॉन या बर्लिन पेशंट म्हणून ओळखल्या जाणार्या ल्युकेमियाग्रस्त व्यक्तीवर अस्थीमज्जा प्रत्यारोपण करण्यात आले होते. डॉक्टरांनी या बालिकेला दुसरा टिमोथी ब्राऊन अशी उपाधी दिली आहे. जर या उदाहरणाची पुनरावृत्ती झाली तर एचआयव्ही संसर्ग आपण बरा करू शकतो हे सिद्ध होईल असा दावा जॉन हाफकिन्स चिल्ड्रेन्स सेंटरचे डॉ. डैबोरा परसौद यांनी एका पत्रकार परिषदेत केला. अशा उपचारामुळे सर्वच एचआयव्हीबाधित रुग्णांना बरे करता येणार नसले तरी मातेपासून बाळांना होणारा संसर्ग रोखता येईल, असे महत्त्वपूर्ण मत त्यांनी मांडले.
या उपचाराच्या दोन वर्षांनंतर या बालिकेत एचआयव्हीचा विषाणू आढळलेला नाही. या बालिकेवरील उपचाराचे निष्कर्ष अद्याप जर्नलमध्ये मात्र प्रकाशित करण्यात आले नाहीत.