‘रामाचे कदम’ राष्ट्रवादीकडे

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक आमदार राम कदम यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाले असून पुढील पंधरा दिवसात कदम मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करतील; अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘माझा पेपर’शी बोलताना दिली.

मुंबईतील आमदार कदम हे मनसेचे महत्वाचे नेते मानले जातात. ‘मनसे स्टाईल’ आक्रमकता, मतदारसंघात विधायक कामांचा धडाका आणि व्यक्तिगत कामांच्या जोरावर कदम यांनी घाटकोपर- विक्रोळी मतदारसंघ बांधला आहे. मात्र मनसेतील वरिष्ठ नेत्यांनी कदम यांच्या मतदारसंघावरंच डल्ला मारण्याचे डावपेच आखल्याने कदम अस्वस्थ असून ‘राष्ट्रवादी’ने त्यांच्यासाठी लाल पायघड्या अंथरल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी कदम यांचे कोणतेही मतभेद नसून राज यांच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे कदम आजही सांगतात. मात्र मनसेचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर आणि कदम यांच्यामधून विस्तवही जात नसल्याचे राजकीय वर्तुळात सर्वज्ञात आहे. नांदगावकर आणि कदम यांच्यातील वितुष्ट नवे नाही. यापूर्वीही नांदगावकर यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे कदम पक्ष सोडण्याच्या निर्णयाप्रत आले होते. मात्र त्यावेळी पक्षाध्यक्ष ठाकरे यांनी हस्तक्षेप करून या वादावर पांघरूण घातले.

तात्पुरती डागडुजी झाली तरीही कदम आणि नांदगावकर यांच्यातील आग धुमसत राहिली. त्यातंच कदम यांच्या मतदारसंघावर नांदगावकर यांचा डोळा असून त्या ठिकाणी कदम यांना डावलून आपल्या निकटवर्तीयाची वर्णी लावण्याचा गटनेत्यांचा प्रयत्न असल्याच्या वृत्ताने आगीत तेल ओतले गेले. त्यामुळे कदम बिथरले असून त्यांनी मनसेला राम-राम करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कदम कोणाचे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचा सूत्रांचा दावा आहे.

या वादाच्या पार्श्वभूमीवर स्वबळावर सत्ता प्राप्त करण्याची भाषा करणार्‍या; मात्र प्रत्यक्षात आमदार संख्येचे शतक गाठून किमान मुख्यमंत्रीपद पटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या राष्ट्रवादीने हा ‘मोठा मासा’ पदरात पडून घेण्यासाठी गळ टाकला. त्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेले आणि कदम यांचे निकटवर्तीय असलेले बांधकाम व्यावसायिक भावेश मेहेता यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या मुत्सद्देगिरीला यश येऊन कदम हे व्यापक जनाधार, कार्यक्षमता, आर्थिक सामर्थ्य आणि बाहुबळ लाभलेले नेते राष्ट्रवादीच्या गळाला लागले; अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत सर्व बाबींची पूर्तता झाली असून केवळ औपचारिकता बाकी आहे; असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

Leave a Comment