मोदींचा प्रभाव

भारतीय जनता पार्टीच्या केन्द्रीय कार्यकारिणीच्या  बैठकीत नरेन्द्र मोदी हेच आकर्षणाचे केन्द्र राहिले. सध्या सगळ्या देशालाच आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असल्याने भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असणार हाच एक चर्चेचा विषय झाला आहे तेव्हा मोदी यांचे कार्यकारिणीच्या बैठकीत प्रभावी होणे किवा कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी त्यांचा आदर करण्याचा अर्थ उघड आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना आता मोदी यांची पंतप्रधानपदाची उमेदवारी स्वीकार्य होत आहे असा हा अर्थ आहे.

साधारण दोन तीन महिन्यांपूर्वी याबाबत पक्षात संभ्रम होता. हा संभ्रम आता कमी होत आहे. अन्य उमदेवारांची नावे आता मागे पडत चालली आहेत. कालच्या बैठकीत हे स्पष्ट झाले असले तरीही लालकृष्ण अडवाणी यांनी सूचकपणे थोडा वेगळा सूर आळवलाच. सारे सदस्य मोदींच्या मागे एकमुखाने उभे रहात असल्याचे चित्र दिसत असताना अडवाणी यांनी मोदी यांना अनुल्लेखाने टाळले आणि सुषमा स्वराज यांना मात्र नको एवढे हरबर्याीच्या झाडावर चढवले. सुषमा स्वराज या लोकसभेतल्या विरोधी  नेत्या आहेत आणि त्यांचे काम ठीक चालले आहे पण त्या मोदींशी सामना करू शकत नाहीत. कारण मोदी यांनी सलग १२ वर्षे राज्याचे प्रशासन उत्तमरित्या चालवून दाखवले आहे. सुषमा स्वराज यांना तसे दाखवता आलेले नाही.

१९९७-९८ मध्ये त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.  त्या काही जनतेतून निवडून आलेल्या मुख्यमंत्री नव्हत्या. तिथे भाजपात नेतृत्वावरून संघर्ष चाललेला होता. तो संपून सर्वसंमतीचा उमेदवार मुख्यमंत्रीपदावर बसवायचा म्हणून पक्षाने त्यांना मुख्यमंत्री म्हणून नेमले होते. त्यांना जनतेतून निवडून न येता पक्षश्रेष्ठींच्या आशिर्वादाने हे पद मिळाले होते. नरेन्द्र मोदी यांचाही प्रकार असाच होता. ते मुख्यमंत्री झाले तेव्हा विधानसभवर निवडून आले नव्हते  पण पक्षश्रेष्ठींच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री झाले. पण त्यांनी आपल्या कौशल्याने राज्यावर आपला जम बसवला. सुषमा स्वराज यांना तशी संधी मिळाली होती पण त्यांच्या कार्यकाळात १९९८ च्या नोव्हेंबर मध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूक झाली आणि तिच्यात भाजपाचा पराभव होऊन  तिथली सत्ता काँग्रेसच्या हातात गेली. ती गेली १५ वर्षे टिकली आहे. शीला दीक्षित यांनी ती टिकवली आहे. 

लालकृष्ण अडवाणी यांची पंतप्रधान होण्याची इच्छा अजून संपत नाही. ती संधी आपल्याला मिळत नाही आणि आपल्या ऐवजी मोदी यांना मिळत आहे याचे वैषम्यही ते लपवू शकत नाहीत. म्हणून ते सुषमा स्वराज यांची तारीफ करून  मोदींना खिजवून आसूरी आनंद मिळवीत असले तरी मोदी यांच्या प्रभावावर आता त्याचा काहीही प्रभाव पडणार नाही. एका इंग्रजी साप्ताहिकाने केलेल्या मतदारांच्या सर्वेक्षणात मोदी यांना राहुल गांधी यांच्यापेक्षाही अधिक मतदारांनी पसंती दर्शविली आहे. तेव्हापासून मोदी यांच्या बाबतचा भाजपातला संभ्रम संपत आला आहे.

मोदी यांच्या  उमेदवारीला नितीशकुमार यांची अडचण होती. त्यांना मोदी पसंत नाहीत. मोदी यांच्या उमेदवारीला आपण समर्थन दिले तर बिहारमधील आपले मुस्लिम मतदार आपल्यावर नाराज होतील म्हणून त्यांनी मोदी यांना विरोध केला होता. नितीशकुमार यांच्या या मताचा परिणाम भाजपाच्या आणि रा. स्व. संघाच्याही नेत्यांच्या मनावर झाला होता. मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार केल्यास कदाचित बिहारमध्ये  असलेले जनता दल आणि भाजपाचे सरकार कोसळेल इतक्या थराला या गोष्टी गेल्या होत्या पण का कोण जाणे पण नितीशकुमार तूर्तास तरी शांत आहेत. बिहारात त्यांच्याच मागे बरीच शुक्लकाष्ठे लागली आहेत. त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे. लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान ही जोडगोळी सावध झाली आहे. त्यांच्या पाटण्यातल्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. तिच्यामुळे ‘हवा का रूख बदला है’ असा संकेत नितीशकुमार यांना मिळाला आहे आणि त्यांना मोदींच्या बाबतीतला ‘कडा रुख’ नरम करावा लागला आहे.

एकंदरीत रालोआघाडीतला मोदी यांना असलेला विरोध थंड पडत आहे. भाजपा नेत्यांची गणिते वेगळी आहेत. मोदींच्या नेतृत्वामुळे भाजपाला देशात लोकसभेच्या २०० जागा मिळतील अशी त्यांना आशा आहे. काही प्रमाणात कमी जास्त मिळाल्या तरीही त्या मिळवून देण्यास मोदीच समर्थ आहेत याची त्यांना जाणीव झाली आहे. अडवाणी यांना सुषम स्वराज यांच्या भाषणात अटलजींच्या भाषणाचा भास झाला असला तरीही त्या काही वाजपेयी ठरत नाहीत आणि त्यांच्यात मोदी यांच्या एवढी मते खेचण्याची ताकदही नाही. हा सारा अटकळींचा खेळ आहे. घोडामैदान दूर असले तरीही भाजपाला १८० च्या आसपास जागा मिळणे आणि काँग्रेसला १४० च्या आसपास जागा मिळणे अशी स्थिती आली की सारी गणिते भाजपासाठी सोपी होतील असे भाजपा नेत्यांना वाटते.

मोदी यांना समाजाच्या सर्व थरात समर्थन मिळत आहे. मागासवर्गीय मतदारांचा सर्वात मोठा पाठिबा मिळवू शकणारे तेच एकमेव नेते भाजपात आहेत आणि अब्जाधीश उद्योगपतीही त्यांच्या मागे उभे राहण्यास तयार आहेत तेव्हा आता भाजपाने त्यांना पुढे केले पाहिजे. अडवाणींना काही का वाटेना.

Leave a Comment