जालीहाळ परिषदेचा संदेश

सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याच्या जालीहाळ या गावी गेले तीन दिवस सिंचन परिषद झाली. तिला जागतिक कीर्तीचे जलतज्ञ डॉ. माधवराव चितळे हेही उपस्थित होते. जत तालुका हा कायम दुष्काळी तालुका आहे. तिथून वाहणार्या  माण नदीला वर्षातून सात आठ दिवसही पाणी येत नाही. माणदेशातून कधी प्रवास केला तर तिथला सारा रखरखाट आणि कोरडेपणा असा काही अंगावर येतो की तो पाहून मन आपोआपच उदास होते. पण सिंचन सहयोग या संस्थेने मुद्दाम या रुक्ष परिसरात सिंचन परिषद घेतली आणि याही प्रदेशात जल संधारणाच्या योजनांच्या मदतीने पाणी जतन करून ठेवल्यास जमिनीला हिरवे वरदान प्रदान करता येते हे दाखवून दिले.

या परिषदेत दोन गोष्टींवर भर देण्यात आला. पहिली म्हणजे दुष्काळावर कायमची उपाय योजना आणि दुसरी म्हणजे उपाय योजनांसाठी करावयाच्या कामात लोकांचा सहभाग. दुष्काळावर नेहमीच मलमपट्टी केली जाते कारण ‘दुष्काळ आवडे सर्वांना’. अनेकांचे हितसंबंध दुष्काळात गुंतलले असतात. काही लोकांना टँकरचे काम मिळते. काहींना चारा छावण्यात वरकड उत्पन्न होत असते तर काही लोकांना जनावराच्या छावण्यात शेणापासून दुधापर्यंत  आयुष्याची मिळकत होणार असते. म्हणून शेतकरी वगळता कोणालाही दुष्काळावर कायम स्वरूपी उपाय योजना नकोशी वाटत असते. म्हणूनच आता शेतकर्यांकनी जागे होण्याची गरज आहे.

आपल्या गावात आणि परिसरात दुष्काळ निवारण्याच्या संबंधात काही होत असेल तर ते काम मलमपट्टीच्या स्वरूपाचे आहे की कायमस्वरूपी उपयगी पडणारे आहे याचा शोध घ्यावा लागेल आणि ते कायमस्वरूपी झाले पाहिजे असे आग्रह धरला पाहिजे. सरकारने तर कोणतेही काम निरंतर उपयोगी पडणारेच झाले पाहिजे असा नियम केला आहे. म्हणून शेतकर्यां नी आपल्या भागातले काम तकलादू आणि तूर्तास काम ढकलणारे होत असेल तर चक्क खटला दाखल करावा असे आवाहन जालीहाळच्या या सिंचन परिषदेत करण्यात आले आहे. या परिषदेत जलसंधारण कामांचा काय परिणाम होतो हे पहायला मिळाले. अनेक गावातल्या अशा भगिरथांचा सत्कार करण्यात आला. ज्यांनी पाणी अडवण्याचा निर्धार केला आणि ते अडवले.
   
त्यांच्या गावातला दुष्काळ संपला. दुष्काळ ही तर एक नैसर्गिक आपत्ती आहे. ती अधून मधुन येणारच असे आजवर आपण मानत आलो. पण ही आपत्ती अशी मधुन आलीच पाहिजे असे काही नाही. आपल्या आयष्यात ती कधीच येता कामा नये अशी सोय करता येते. दुष्काळाला कायमचा राम राम ठोकता येतो. ते फार अवघडही नाही हेही दिसायला लागले आहे. यासाठी करायचे काम हे फारच तंत्रकौशल्याचे आहे असेही काही नाही. ते एकदा करायला शिकलो की आपली दुष्काळातून कायमची मुक्तता होऊ शकते. ही गोष्ट आता पुस्तकातली राहिलेली नाही. ती आता जमिनी हकिकत अर्थात वस्तुस्थिती झाली आहे. हे तिथे आलेल्या अनेक कर्मवीरांनी छातीवर हात ठेवून सांगितले.

अनेक ठिकाणी तर श्रमदानाने कामे केली आहेत. काही ठिकाणी लोकांनी वर्गणी गोळा केली आणि स्वतःच्या निगराणीखाली कामे करून घेतली. त्यांच्या यशाचे रहस्य  त्यांच्या स्वयंस्फूर्तीत आहे आणि त्यांनी मिळवलेल्या गावकर्यां च्या सहभागात आहे. गावाने मनावर घेतले की  ही कामे फार पटापट होत असतात. याबाबतीत सरकारवर अवलंबून राहून चालत नाही. जे सरकार काही तरी करील म्हणून वाट पहात बसले त्यांना काहीही करता आले नाही.

दुष्काळ कायमचा हटवणे फार अवघड नाही पण ते काम सरकारवर सोपवले तर ते कधीच होणार नाही. हेच काम गावातल्या लोकांनी मिळून केले तर मात्र ते आठवड्याच्या आता होईल. अर्थात गावकर्यां त काही प्रेरणा जागृत कराव्या लागतील. कारण असे प्रयोग करताना पैसाही उभा करावा लागतो आणि साथी हाथ बढाना म्हणून काम करावे लागते. काही वेळा जागा संपादित करण्याचा प्रश्न येतो. असा प्रश्न रेंगाळत ठेवला तर ३० ते ४० वर्षें रेंगाळत पडतो पण गावाने ठरवले तर केवळ पाच मिनिटात निकाली निघतो. म्हणजे आता जलसंधारण हा प्रश्न कळीचा झालेला नाही तर लोक सहभागातून जलसंधारण हा शब्द कळीचा झाला आहे.

एक हजार लोकवस्तीचा पाण्याचा वनवास कायमचा संपवायचा असेल तर त्या गावातल्या लोकांना दरडोई फार तर पाच हजार रुपये आणि प्रत्येकाचे दोन ते तीन तासांचे श्रमदान पुरेसे होते. महाराष्ट्रातल्या दुष्काळ दुष्काळ करीत बसलेल्या अभागी जनतेला हे सांगण्याची वेळ आली आहे की, आपला उद्धार आपणच करीत असतो. दुसरे कोणी तरी येऊन आपला उद्धार करील याची वाट पहात बसू नका.

Leave a Comment