इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज सन्मान अनामिकेला जाहीर

दिल्लीत डिसेंबरच्या १६ तारखेला चालत्या बसमध्ये बलात्कार करून बसमधून बाहेर फेकण्याच्या घटनेतील २३ वर्षीय तरूणीला अमेरिकेचा इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात आला असून अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा आणि परराष्ट्र सचिव जॉन केरी यांच्या हस्ते हा पुरस्कार ८ मार्चला महिला दिनामिमित्ताने दिला जाणार आहे.

अमानुष बलात्कारासारखी घटना घडूनही या तरूणीने जे अतुलनीय धैर्य दाखविले आणि श्वासात श्वास असेपर्यंत न्यायासाठी लढा दिला त्यामुळे भारतातीलच नव्हे तर जगातील महिलांचे अन्यायाविरूद्ध लढण्यासाठीचे मनोधैर्य उंचावले आहे. तिच्या कुटुंबानेही धैर्याने या संकटाचा सामना केला आणि अन्यायाविरूद्ध लढा दिला आहे. मरणशय्येवर असतानाही या तरूणीने पोलिसांना जबाब दिले आणि गुन्हेगारांना शिक्षा झालेली पाहिपर्यंत जिवंत राहण्याची उमेद कायम राखली असे या पुरस्काराच्या सन्मान पत्रात नमूद करण्यात आले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील या तरूणीने जिद्दीने दिलेल्या लढ्यामुळे भारतीय समाज पेटून उठला आणि महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी सरकारला विशेष कायदा करावा लागला हे या लढ्याचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.

अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेटसतर्फे २००७ पासून दरवर्षी वुमन ऑफ करेज हा पुरस्कार जगातील अतुलनीय धैर्य आणि नेतेपद भूषविणाऱ्या तसेच महिला हक्कासाठी आणि महिला सबलीकरणासाठी विशेष कार्य करणाऱ्या महिलांना दिला जातो. आत्तापर्यंत ४५ देशांतील ६० महिलांना हा पुरस्कार दिला गेला आहे.

Leave a Comment