ढाक्यात भारतीय राष्ट्रपतींच्या हॉटेलजवळ स्फोट

ढाका: भारताचे राष्ट्रपती दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्‍यावर असून ते ढाक्यातील ज्या हॉटेलात उतरले आहेत त्या हॉटेल जवळ सोमवारी दुपारी एका गावठी बाँबचा स्फोट करण्यात आला. तथापि त्यात कोणीही जखमी झालेले नाही.

बांगलादेशच्या अधिकृत भेटीवर आलेल्या मुखर्जी यांची राहण्याची व्यवस्था सोनारगाव या हॉटेलात करण्यात आली आहे. तेथून अर्धा किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाला आहे. मात्र तो भारताच्या राष्ट्रपतींना लक्ष्य करण्यासाठी केला असण्याची शक्यता नाही; असे बांगलादेशातील भारतीय उपउच्चायुक्त संदीप चक्रवर्ती यांनी सांगितले. ते म्हणाले की बांगलादेशात सध्या निदर्शने सुरू असून त्या अनुषंगाने ढाक्यात अशा प्रकारचे स्फोट घडवून आणण्याचा प्रकार हा नित्याचा आहे.

बांगला देशात १९७१ च्या युद्धाच्यावेळी सामूहिक हत्या केल्याच्या आरोपावरून एका इस्लामी मूलतत्ववादी नेत्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्या विरोधात बांगलादेशात सध्या निदर्शने सुरू आहेत. जमाते इस्लामी ही संघटना या निदर्शनांचे नेतृत्व करीत आहे. गेले काही दिवस सुरू असलेल्या या हिंसक निदर्शनात ७० जण ठार झाले आहेत. बांगला देश स्वतंत्र झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात त्या देशात हिंसाचार झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

Leave a Comment