ठीक बोले राज साहब

राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. एकमेकांवर शब्दांचे प्रहार करण्याबरोबरच दगडफेकही सुरू झाली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या जुगलबंदीमुळे करमणूक होत असल्याचे म्हटले आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीलाच का लक्ष्य केलेय हे माहीत नाही पण त्याऐवजी त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले असते तर मुख्यमंत्र्यांनाही राज ठाकरे यांना उत्तर द्यावे लागले असते. त्यांनाही जुगलबंदीत सामील व्हावे लागले असते. तूर्तास राज ठाकरे अजित पवारांवर तोफा डागत आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांना हायसे वाटत असेल.

राज ठाकरे आणि अजित पवार यांची जुगलबंदी मोठी दुर्दैवी आहे. तिच्यात ते एकमेकांवर आरोप करून थांबलले नाहीत, परस्परांची केवळ खिल्लीच उडवून थांबलेले नाहीत तर  एकेरीवर आले आहेत. आपल्यावर होणारा हल्ला अधिक शिवराळपणा करून परतवण्याचा दोघांचाही प्रयत्न आहे.  दोघेही गुंडगिरीच्या पातळीवर आले आहेत. पण त्यातही काही वेळा मजेदार प्रकार घडतो. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना प्रत्यक्षात मारामारीला येण्याचे आव्हान दिले. गृह खाते आणि पोलीस यांना बाजूला हटवून मैदानात या मग बघतो कसे हातीपायी धड घरी जाता ते, असे आव्हान त्यांनी दिले. हा काय प्रकार आहे हे काही कळत नाही.

महाराष्ट्राचे प्रश्न कसे सोडवावेत याबाबतचे दोन पक्षांतले वैचारिक मतभेद आपण समजू शकतो. पण दोन पक्ष परस्पयांना प्रत्यक्षात मारामारी करायला येण्याचे आव्हान देत आहेत. हा मोठा अजब प्रकार आहे. पुण्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी तर, राज ठाकरे यांनी पुण्यात येऊन दाखवावेच असे थेटच आव्हान दिले. त्याला राज ठाकरे उत्तर देणारच. त्यांनी उत्तर दिले.  ‘मी पुण्यात येऊन दाखवतोच की नाही ते बघाच. कोणी कोणाला कोणत्याही गावात जायला प्रतिबंध करू शकत नाही. भारतीय घटनेने कोणालाही कठेही जाण्याचा हक्क दिला आहे.‘ भारतीय घटनेने भारतीय नागरिकांना दिलेले संचार स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्याचा महिमा राज ठाकरे यांच्या तोंडून ऐकताना मजा वाटत होती.

गेली सात वर्षे  राज ठाकरे बिहार आणि उत्तर प्रदेशातून मुंबईसह महाराष्ट्रात  येणार्याा लोकांच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. त्यांच्या मुंबईत येण्याने मुंबई बकाल होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. राज ठाकरे यांच्या या आंदोलनाला विरोध करणारांनी त्यांना हेच सांगितले आहे. भारतीय घटनेने कोणालाही कठेही जाण्याचा हक्क दिला आहे. हेच वाक्य त्यांना ऐकवण्यात आले आहे. राज ठाकरे यांना पुण्यात येऊन सभा घेण्याचा जेवढा हक्क आहे तेवढाच बिहारी माणसाला पोटासाठी मुंबईत येण्याचा हक्क आहे. पण राज ठाकरे यांना आपला पुण्यात येण्याचा हक्क मान्य आहे. बिहारींचा  मुंबईत येण्याचा हक्क मान्य नाही.

भारतीय घटनेने बिहारी नागरिकांना दिलेल्या या स्वातंत्र्यावर कोणी घाला घालत असेल आणि त्यांना महाराष्ट्रातून हाकलून द्यावे अशी मागणी करीत असेल तर अशा प्रसंगी बिहारी नागरिकांना संरक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. देशातल्या कोणत्याही राज्यात असा प्रसंग आला तर त्या राज्यातले सरकार असे संरक्षणच देईल. पण राज ठाकरे महाराष्ट्राच्या सरकारला अशा वेळी लाखोली वाहतात. पण हेच महाराष्ट्राचे पोलीस राज ठाकरे यांना पुण्यात येताना संरक्षण देतील तेव्हा त्यांना तो आपला हक्क वाटेल. आता राज ठाकरे सारवा सारवी करतील की आपण बिहारी लोकांना मुंबईत येण्यास पूर्ण बंदी करावी असे कधी म्हटलेच नाही. त्यांनी यावे पण येथे येऊन आपला राजकीय अजेंडा राबवू नये, बिहार दिन साजरा करू नये असे म्हटले आहे.

खरे तर असा कोणाला कोठे जाऊन राजकीय अजेंडा राबवण्यावरही घटनेने बंदी घातलेली नाही पण राज ठाकरे यांचे म्हणणे तसे आहे. ते म्हणतात बिहारींनी मुंबईत यावे पण येथे येऊन दादागिरी आणि गुंडगिरी करू नये. आता दादागिरी आणि गुंडगिरीला कोठेही बंदीच आहे. बिहारींना महाराष्ट्रात येऊन गुंडगिरी करणे वाईट आणि मुंबईत मनसेने गुंडगिरी करणे मात्र वैध असा काही घटनेने फरक केलेला नाही पण अंकुश काकडे हेही काही राज ठाकरे यांना पुण्यात येण्यास निव्वळच बंदी  करावी असे म्हणत नाहीत. त्यांनी पुण्यात यावे पण येथे येऊन पुणे जिल्हयातल्या नेत्यांना शिविगाळ करू नये. बिहारींच्या मुंबईतल्या गुंडगिरीला जसा राज ठाकरे यांचा विरोध आहे तसाच  राज ठाकरे यांच्या पुण्यातल्या गुंडगिरीला अंकुश काकडे यांचा विरोध आहे.

अंकुश काकडे यांनी राज ठाकरे यांना पुण्यात येण्याबाबत काही आव्हान देताना फार काही विचार केला नसेल पण त्यांच्या आव्हानातून आणि राज ठाकरे यांच्या प्रतिआव्हानातून नकळतपणे (अगदी अंकुश काकडे यांच्याही नकळत) राज ठाकरे यांच्या कथित  विचारसरणीतली विसंगती उघड झाली आहे. कोणताही राजकीय पक्ष निव्वळ कोणाच्या तरी द्वेषावर आधारलेला असतो आणि सखोल विचार न करताच समोर दिसेल तो कार्यक्रम उथळपणे स्वीकारतो तो पक्ष आणि त्याचे नेते असेच परस्पर विसंगत भूमिका घेताना उघडे पडतात आणि त्याचा वैचारिक बुरखा असा गळून पडतो.

Leave a Comment