सलमानकडून छळवणुकीचा मच्छीमाराचा आरोप

मुंबई:आपल्या स्टार कॉटेजेसमधून सागरी नजारा पाहण्यात अडथळा येत असल्यामुळे अभिनेता सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकांनी बोटी आणि जाळे हलविण्याची धमकी दिल्याचा आरोप वांद्रे येथील एका मच्छीमाराच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी सलमान व त्याच्या अंगरक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची लेखी मागणी अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली आहे.

लॉरेन्स फाल्कन (वय ६५) असे या मच्छीमाराचे नाव आहे. सन २०११ मध्ये सलमानने बांद्रातील चिंबई भागात ‘बेल्ले व्ह्यू’ आणि ‘बेनार’ अशी दोन कॉटेजेस विकत घेतली होती. त्याभोवती बॅरिकेटसही उभारण्यात आली होती. किनार्‍यावर आपल्या बोटी पार्क केल्यामुळे सागरी दृश्याचा आनंद लुटता येत नसल्यामुळे त्या हटविण्याची धमकी दिल्याचा फाल्कन यांचा आरोप आहे.

गेल्या वर्षी आपण बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये तीनदा तक्रार करूनही सलमानविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) न नोंदवता केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवला, असा फाल्कन यांचा दावा आहे. दरम्यान, नांगरे-पाटील यांनी त्यांना मंगळवारी पुन्हा बोलावले आहे.

Leave a Comment