भीमाशंकर – शेकरूचे वसतीस्थान

घनदाट अरण्य, अभयारण्याचा फेरफटका आणि सुंदर शिवमंदिर असा मेनू हवा असेल आणि हाताशी एखाद्या दिवसाचाच वेळ असेल तर भीमाशंकर या ठिकाणाला पर्याय नाही. पुण्यापासून जवळ असलेले १२ ज्योतिर्लिंगातील एक शिवलिंग असलेले भीमाशंकर हे छोट्या सहलीसाठीचे एक आकर्षक स्थळ आहे. डोळ्याना तृप्त करणारा निसर्ग आणि तनमनाला ताजे करणारी हवा अनुभवण्यासाठी तरी येथे जायलाच हवे. सर्वसामान्य पर्यटकांप्रमाणे ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठीही हे ठिकाण खास म्हणावे लागेल.
Bhimashankar2
भारतात विशेष समजल्या जाणाऱ्या  बारा ज्योतिर्लिंगापैकी एक शिवमंदिर प्रथम पाहून घ्यावे. हे हेमाडपंथी मंदिर दगडातून बांधले गेले असून त्यावरचे कोरीवकामही भुरळ घालणारे आहे. या गावाला नांव मिळाले ते भीमा नदीवरून. कथा अशी सांगतात की शंभू महादेवाने येथे राक्षस त्रिपुरासुराशी युद्ध करून त्याला ठार मारले. या दोघांच्या युद्धामुळे इतकी उर्जा उत्पन्न झाली की भीमा नदीचे पाणीही उकळू लागले. म्हणून हे भीमाशंकर. शंकराची येथील पिंड दोन भागात विभागलेली आहे. छोटा भाग पार्वती आणि मोठा भाग शंकर समजला जातो. हे मंदिर नाना फडणीस यांनी १८ व्या शतकात बांधले असे इतिहास सांगतो.
Bhimashankar1
भीमाशंकरचे अभयारण्य अनेक जातींच्या सुंदर पक्ष्यांचे तसेच अनेक प्रकारच्या वन्य जीवांचे निवासस्थान आहे. मात्र त्यात सर्वात महत्त्वाची आहे ती देवखार. यालाच शेकरू असेही म्हटले जाते आणि हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. हे जंगल हे सदाहरित वृक्षाचे जंगल असून येथे अनेक औषधी वनस्पतीही आढळतात. आदिवासीही येथे राहतात. आता आपल्यालाही अभयारण्यात एखादा मुक्काम करता येतो. त्यासाठीच्या सुविधा उपलब्ध आहेत. १२० चौरस किमीचे हे अभयारण्य फोटोग्राफर्स, पक्षीप्रेमी, प्राणीप्रेमींसाठी फार मोठी देणगी आहे. याच जंगलातून फार पूर्वी पांडवांनीही आपली वाट शोधली होती असेही सांगितले जाते.
Bhimashankar
भीमाशंकरला पाऊस खूप पडतो. ट्रेकर्स तसेच रॉक क्लायबिंग सारख्या साहसी क्रिडाप्रेमींसाठी हा काळ सर्वात उत्तम. पिण्याचे पुरेसे पाणी बरोबर ठेवणे मात्र गरजेचे. हिरवागार निसर्ग, सह्याद्रीच्या पश्चिम घाटाची शान, भलेमोठाले कातळ, विविध प्रकारची झाडेझुडपे, ६० फूटांपेक्षाही अधिक वाढलेले महाकाय वृक्ष यांची मोहिनी कांही वेगळीच.

पुण्याहून तसेच कर्जतहूनही भीमाशंकर येथे जाणे सुलभ पडते. चार तासांचा हा प्रवास लाल मातीचे डोंगर, अवघड घाट, अरूंद रस्ते, डोंगरातून अवखळपणे वाहणारे ओघळ यांनी परिपूर्ण आहे. विकएंड साठी किवा अगदी एक दिवसाच्या सहलीसाठी सुद्धा हे स्थान अगदी मस्त आहे.

Leave a Comment