हैदराबाद – राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी टीम इंडियाने दमदार सुरुवात केली. सेहवाग लवकर बाद झाल्यानंतर सामन्याची सूत्रे हाती घेतली. त्याला दुसर्या बाजूने पुजाराही योग्य साथ देत आहे. या दोघांनीही शतक झळकावले असून दुसर्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा टीम इंडियाच्या १ बाद ३११ धावा झाल्या आहेत.
सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवागने भारतीयांना पु्न्हा निराश केले आहे. सिडलच्या उसळत्या चेंडूला त्याच्या बॅटचा कोपरा लागला आणि विकेटकीपर वेडने अलगद त्याचा झेल टीपला. चेन्नईमधील अपयशाचा कित्ता त्याने हैदराबादमध्येही गिरवला. उपहारापर्यंत टीम इंडियाच्या फलंदाज ऑस्ट्रेलियापुढे चमकदार कामगिरी करताना दिसत नव्हते. पहिल्या १७ षटकात त्यांनी केवळ २९ धावा केल्या होत्या. उपाहारापर्यंत ३० षटकांत टीम इंडियाने ५४ धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र मुरली आणि चेतेश्वरने सूर पकडला.
खेळ संपला तेव्हा मुरली १६२; तर चेतेश्वर १२९ धावांवर खेळत होते. भारताने कांगारूंवर ७४ धावांची आघाडी घेतली आहे.
हैदराबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हैदराबादची खेळपट्टी सुरुवातीला दोन दिवस फलंदाजांना मदत करेल आणि नंतर येथे फिरकीपटू दादागिरी करतील, असे बोलले जात होते. मात्र, भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन टीम ९ बाद २३७ धावा अशी संकटात सापडली होती. पहिल्या दिवसाचा खेळ संपायला पाच षटके शिल्लक असताना क्लार्कने भारताची एखादी विकेट घेण्याच्या इराद्याने आपला डाव घोषित केला. मात्र, क्लार्कची रणनीती पूर्णत: फ्लॉप गेली.