कांगारुविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाज आर. अश्विनने चार धक्के देत अडचणीत आणले. त्याने सलामीवर एड कोवान, फिल ह्युजेस, डेव्हीड वॉर्नर, शेन वॉटसनला बाद केले. वॉर्नरने एक बाजू लावून धरत अर्धशतक पूर्ण केले त्याने वॉटसनसोबत अर्धशतकी भागीदारी करुन उपाहारार्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या दोन गडी बाद १२६ झाली होती. उपहारानंतर सलग दोन झटके दिल्याने कांगारूची अवस्था शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा चार गडी बाद १३६ अशी झाली होती.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सलामीवीर डेव्हीड वॉर्नरला दोन जीवदान मिळाली. त्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. अश्विनच्या गोलंदाजीवर वार्नरला सर्वप्रथम सेहवागने जीवदान दिले. पहिल्या स्लीपमध्ये त्याचा झेल सेहवागने सोडला. त्यानंतर अश्विनच्याच गोलंदाजीवर धोनीने वॉर्नरला यष्टीचीत करण्याची संधी सोडली होती.
दरम्यान अश्विनने फिल ह्युजेसचा त्रिफळा उडवून कांगारुंना दुसरा धक्का दिला. आखुड टप्प्याच्या चेंडूवर कट करण्याच्या प्रयत्नात बॅटची कड घेऊन चेंडू स्टंपवर आदळला. ह्युजेसने सहा धावा काढल्या. भारताला १५व्या षटकात सलामीची जोडी फोडण्यात यश आले. अश्विनच्या गोलंदाजीवर एड कोवान यष्टीचीत झाला. धोनीने मिळालेल्या संधीवर शिताफीने काम फत्ते केले. कोवान २९ धावा काढून बाद झाला. वॉर्नरसोबत त्याने ६४ धावांची सलामी दिली. उपहारानंतर अश्विनने सलग दोन झटके देताना डेव्हीड वॉर्नर (५९), शेन वॉटसनला (२८ ) धावावर पायचीत केले. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा कांगारूची अवस्था चार गडी बाद १३६ अशी झाली होती. कर्णधार मायकल क्लार्क आणि मथ्यू वाडे हे दोघे खेळत होते. अश्विनने ३६ धावा देऊन चार गडी बाद केले.
दरम्यान भारतीय संघात सलामीवीर म्हणून मुरली विजयला संधी मिळाली आहे. त्यासोबतच हरभजन सिंग व रविंद्र जडेजाला संघात स्थान देण्यात आले आहे.