नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी गुरुवारी अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केलेली महिला बँक यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून कार्यान्वित होणार आहे.भारतातील ही पहिली महिला बँक असून या बँकेच्या सहा शाखा असतील. प्रत्येक महत्वाच्या प्रदेशात या बँकेची एक शाखा असेल असे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी रविवारी सांगितले.
महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने महिला बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला बँकेची ही संकल्पना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची आहे का; या प्रश्नावर चिंदबरम म्हणाले की; जयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात महिला बँकेचा विचार पुढे आला होता. मी स्वत: याचा अभ्यास करुन महिलांसाठी राष्ट्रीय बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
महिला बँकेची ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी चिंदबरम बँकिंग क्षेत्रातील तज्ञांची मदत घेणार आहेत. मार्चअखेरपर्यंत ब्ल्यूप्रिंट हाती आल्यानंतर अंमलबजावणी सुरु करणार असल्याचे चिंदबरम यांनी सांगितले. या महिला बँकेला सरकारकडून प्रारंभी एकहजार कोटीचे भांडवल दिले जाणार आहे. ही बँक संपूर्णपणे सरकारच्या मालकीची असणार आहे. या महिला बँकेमुळे महिला बचत गटांना सर्वाधित लाभ होण्याची शक्यता आहे.