दुस-या दिवशी टीम इंडियाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणा-या शतकवीर कर्णधार मायकल क्लार्कचा अडसर फिरकीपटू रवींद्र जडेजाने दूर केला. त्यानंतर अश्विन आणि हरभजनने एक -एक विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३८० धावात संपुष्टात आणला. या सामन्यात भेदक फिरकी मारा करताना आर. अश्विनने सात गडी बाद केले.
दुस-या दिवशी सकाळच्या सत्रात सुरुवातीचे दीड तास क्लार्क-सिडल जोडीने भारतीय गोलंदाजांना दाद दिली नाही. ही जोडी टीम इंडियाला महागात पडेल असे वाटत असतानाच जडेजाच्या एका सुंदर चेंडूवर फटकावण्याचा प्रयत्नात उडालेला क्लार्कचा झेल भुवनेश्वर कुमारने पकडला. क्लार्क १३० धावा काढून बाद झाला. क्लार्क बाद झाल्यानंतर सर्वांनी निश्वास सोडला.
त्यांनतर लगेचच स्थिरावलेला सिडलही बाद झाला. कसोटीचे शतक पूर्ण करणा-या फिरकीपटू हरभजनसिंगला अखेर सिडलच्या रूपात पहिली विकेट मिळाली. मंदगतीने टाकलेला ‘दुसरा’ चेंडूच्या जाळयात सिडल फसला. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या सेहवागने यावेळी कोणतीही चूक न करता सिडलचा १९ धावांवर झेल घेतला. त्यानंतर आर अश्विनने लायनची ३ धावावर बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव ३८० धावावर संपुष्टात आणला. या सामन्यात अश्विनने ७, जडेजाने २ तर हरभजनने एक गडी बाद केला.