संवेदनशील, जोशपूर्ण मैत्री ‘काय पो छे’

बॉलिवूडमध्ये मैत्रीवर आणि मित्रांवर अनेक चित्रपट बनवले गेले आहेत पण एकाच वेळेस मनोरंजन आणि संवेदनशीलतेच्या बाबतीत फारच थोड्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. कदाचित तीच कमतरता भरून काढायचा प्रयत्न ‘काय पो छे…’ मधून करण्यात आला आहे. ही कथा आहे मैत्रीची आणि त्याचसोबत महत्वाकांक्षेची! ज्यांनी चेतन भगतची ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ ही कादंबरी वाचली त्यांच्यासाठी ही कथा नवीन नसेल पण ती कथा पडद्यावर पाहण्याचा अनुभव संस्मरणीय ठरणार यात शंका नाही.

‘काय पो छे…’ ही इशांत भट्ट (सुशांत सिंग राजपूत), ओंकार शास्त्री (अमित साध), गोविंद पटेल (राजकुमार यादव) अहमदाबादच्या तीन मित्रांची कथा आहे. या तरुणांच्या डोळ्यातही स्वप्नं आहेत आणि काही महत्वाकांक्षा त्यांना पूर्णही करायच्यात. गरिबीतून मार्ग काढंत शिक्षण पूर्ण करणार्‍या गोविंदचं स्वप्न आहे स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा! ईशान क्रिकेट वेडा, तर ओमी कदाचित आपली स्वप्नं धुंडाळणारा…; तिघांचा रस्ता एकाच चौकात येऊन मिळतो तो म्हणजे ‘क्रिकेट’ आणि मग सुरु होतो तो क्रिकेटशी संबंधित वस्तूंचं आणि क्रिकेटचं ट्रेनिंग देण्याचा व्यवसाय. मात्र तिघांच्या जीवनाची ध्येय मात्र वेगळी आहेत.

अली नावाच्या एका लहानग्या खेळाडूमध्ये ईशान आपलं स्वप्नं बघतो. त्याच्या क्रिकेटच्या प्रशिक्षणाची जबाबदारी ईशान आपल्या खांद्यावर घेतो आणि ईशानला त्यात आपलंही ध्येय दिसतं. ओमीला मात्र आपल्या मित्रांची सोबत हवीहवीशी वाटते. त्यामुळे तो त्यांच्यासोबतच कोणत्याही ठाम मताशिवाय आहे.

कालांतराने आजूबाजूच्या घटनांमध्ये बदल होतो आणि त्याचे पडसाद या तिघांच्या जीवनावर उमटतात आणि तिघे वेगवेगळ्या दिशेने जाऊन पुन्हा एकत्र येतात.

दिग्दर्शक अभिषेक कपूरने तरुणाईला डोळ्यासमोर ठेऊन हा चित्रपट तयार केला आहे. कथानक थोडं वेगळं असलं तरी ते आपल्याचं आजूबाजूला घडणार्‍या घटनांवर बेतलेलं आहे. कथानक अनेकदा नवं वळण घेते. मित्रांची धमाल-मस्ती पाहायला मिळते मात्र त्यांनी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी कॉलेज कॅम्पस, रोमान्स, ब्रेकअप अशा रटाळ गोष्टी टाळल्या आहेत.

त्याऐवजी राजकारण, क्रीडा, जातीय दंगल याबरोबरच नैसर्गिक आपत्ती अशा गोष्टी प्रेक्षकांना रटाळ वाटणार नाहीत; अशा पद्धतीने सादर केल्या आहेत. दिग्दर्शकाने व्यक्तिरेखा आणि महत्त्वपूर्ण घटनांचे अगदी वास्तवदर्शी चित्रण केले आहे. कादंबरीतून घेण्यात आलेली तीन पात्रसुद्धा वास्तविक आयुष्यात जिवंत वाटतात.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्‍या सुशांत सिंह राजपूतने आपल्या पहिल्याच चित्रपटात जोरदार परफॉर्मन्स दिला आहे. अमित साध यानेही ओमीची भूमिका जिवंत ठेवलीय. तर राजकुमार यादवने आपण अभिनयात इतरांपेक्षा कमी नसल्याचं दाखवून दिले आहे.

अमित त्रिवेदीच संगीत कथेला सुसंगत असे आहे. ‘मांजा..’ हे गीत तर सध्या तरूणाईच्या ओठांवर रेंगाळत आहे. जर तुम्हाला संदेश देणारे, सकारात्मक विचार असणारे, संघर्ष करुन ध्येय गाठणा-या व्यक्तिरेखा आणि विचार करायला लावणारे चित्रपट आवडत असतील तर ’काई पो छे’ हा आवर्जून बघावा.

चित्रपट – काई पो छे, निर्माता – रॉनी स्क्रुवाला, सिधार्थ रॉय – कपूर, दिग्दर्शक – अभिषेक कपूर, संगीत – अमीत त्रिवेदी, कलाकार – सुशांत सिंग राजपूत, राज कुमार यादव, अमित साध, अमृता पुरी

Leave a Comment