राज ठाकरे चेकाळले

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्यावर काही लिहिले होते पण त्यावर ते काही तरी विचार करतील आणि आपली भाषा सभ्यतेच्या पातळीवर आणतील असे वाटले होते पण काही घडले नाही. त्यांच्या सभेला गर्दी होत आहे आणि ती आपल्या भाषणाला प्रतिसाद देत आहे हे पाहून त्यांना गर्दीची नशा चढायला लागली आहे. आपण जितके अचकट विचकट बोलू तेवढा आपला जनाधार वाढत जाईल असा त्यांना भ्रम होत आहे आणि ते अधिकाधिक बेताल वक्तव्ये करायला लागले आहेत. त्यांना स्वतःच्या बळावर राज्य काबीज करायचे आहे असा त्यांचा दावा आहे पण आम्ही देवाला प्रार्थना करीत आहोत की देव करो आणि राज ठाकरे यांच्या हातात चुकूनही सत्ता न जावो. कारण  महाराष्ट्राचा नेता एवढा असभ्य असेल तर महाराष्ट्राला पदोपदी शरमेने मान खाली घालायला लागेल.

नरेंद्र मोदी यांचा कारभार कितीही चांगला असला आणि आता राज ठाकरे त्यांना देवही मानत असले तरी त्यांनी फार तर एवढे म्हणायला हरकत नव्हती की, महाराष्ट्रातल्या नेत्यांनी मोदीपासून काही तरी शिकावे. एवढे ठीक होते पण आपल्या भाषेला खालच्यातल्या खालच्या स्तरावर नेऊन ते म्हणाले, महाराष्ट्रातल्या नेत्यांनी मोदींच्या आंघोळीच्या पाण्याचे तीर्थ प्यावे. महाराष्ट्रातल्या नेत्यांत अनेक दोष आहेत आणि मोदी चांगले प्रशासक आहेत हे मान्य पण मराठी नेते एवढेही निकम्मे नाहीत की, त्यांनी वाच्यार्थाने आणि लक्ष्यार्थानेही मोदी यांच्या स्नानाच्या पाण्याचे तीर्थ प्यावे आणि मोदीही तेवढे मोठे नक्कीच नाहीत.

एखादा नेता मोठा असला म्हणजे असे तीर्थ घ्यावे लागते की काय हे आम्हाला माहीत नाही पण राज ठाकरे यांनी गुजरातच्या दौर्यासत काय काय प्राशन केले आहे याचा शोध घ्यावा लागेल. महाराष्ट्राचे नेतृत्व मागणारा हा नेता एवढी जीभ सैल सोडून बोलू शकतो यावरून त्याची मानसिक विकृतीही कळते आणि त्याची पात्रताही कळते.    महाराष्ट्रात एवढे मोठे नेते होऊन गेले पण एवढी गलिच्छ भाषा कोणी वापरली नव्हती. आपण समाजाचे नेतृत्व करण्याच्या गोष्टी बोलत आहोत पण समोर बसलेल्या छचोर श्रोत्यांच्या टाळ्या आणि शिट्टया यांचा अर्थ आपल्याला कळत नसेल तर आपण आपली लायकी तपासून पाहिली पाहिजे हे या बेधुंद माणसाला कधी कळणार आहे. त्यांच्या भाषणाला प्रतिसाद देणारे लोकच नंतर या असभ्य भाषेबद्दल  नापसंती व्यक्त करीत असतील. पण काही खुषमस्करे त्यांची तोंडावर स्तुती करीत असतील म्हणून ते हुरळून जात असतील तर त्यांची मानसिक पातळी तपासून पाहिली पाहिजे. प्रसिद्धीची नशा फार वाईट असते.
 
लोकशाहीत कोणालाही कोणावरही टीका करण्याचा अधिकार आहे पण कोणताही अधिकार दोन प्रकारचा असतो. कायद्याने दिलेला आणि नैतिक. यातला पहिला अधिकार वापरून राज ठाकरे बरळत चालले आहेत पण त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. कारण त्यांचे प्रलाप तर्कशुद्ध नाहीत आणि मानमर्यादा ओलांडणारे आहेत. अजित पवारांच्या अनुयायात त्यामुळे असंतोष आहे आणि त्यांनी काल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राज ठाकरे यांचे पुतळे जाळून आपला राग व्यक्त केला आहे. याउपरही त्यांनी आपल्या  वाचाळपणाला लगाम घातला नाही तर त्यांच्यावर प्रत्यक्षात हल्ला झाल्यास त्याचे नवल वाटणार नाही इतका हा वाचाळपणा संतापजनक आहे.

हा झाला कायद्याने दिलेल्या अधिकाराचा मुद्दा पण त्यांना अशी टीका करण्याचा नैतिकही अधिकार नाही कारण त्यांच्या टीकेत नकारात्मकता ओतप्रोत भरलेली आहे.  राज्यकर्ता पक्ष हा अनेक तणावाखाली काही निर्णय घेत असतो. प्रशासन, जनता आणि माध्यमे यांच्या ओढाताणीतून समतोल निर्णय घेता घेता त्यांना नाकी नऊ येत असतात. त्यात एखादा निर्णय चुकतो. अशा चुकीच्या संदर्भात जाहीर सभत बोलताना सत्ताधारी वर्गाची अक्कल काढणे सोपे असते पण प्रत्यक्षात कारभार चालवून दाखवणे अवघड असते. तसा राज ठाकरे यांनी कधीच चालवून दाखवलेला नाही. संधी मिळाली तेव्हाही नाही.

१९९५ साली शिवसेनेच्या हातात सत्ता होती तेव्हा राज ठाकरे शिवसेनेतच होते पण उद्या चालून महाराष्ट्र माझ्या हातात सोपवा म्हणण्याचे धारिष्ट दाखवणार्या  राज  ठाकरे यांनी त्या काळात इकडचा कागद तिकडे हालवून सुद्धा दाखवलेला नाही. आता मात्र बाळासाहेबांच्या स्टायलीत, ‘माझ्या हातात महाराष्ट्राची सूत्रे सोपवून तरी दाखवा,’ असे आवाहन करीत आहेत. पण तसे झाल्यास ते महाराष्ट्राचे काय कल्याण करणार आहेत याची काही तरी झलक त्यांनी दाखवायला हवी.

तशी संधी त्यांना नाशिक महापालिकेत चालून आली आहे पण सहा महिने झाले तरीही त्यांनी अजून तरी तिथे एकही दिवा लावलेला नाही. प्रशासन, सामान्य माणसाचे जीवन, स्थिती आणि समस्या यांची कसलीही कल्पना त्यांना नाही. त्यांच्या भाषणात त्यांनी काही वृत्तपत्रातली कात्रणे वाचून दाखवून आपला अभ्यासूपणा दाखवायचा प्रयत्न केला आहे पण ते केवळ बातम्या वाचतात ही काही राज्यकर्त्यांची पात्रता ठरत नाही. त्यावर त्यांचे विश्लेषण आणि समस्येवरचा उपाय काय आहे हे त्यांनी सांगायला हवे पण त्यांच्या भाषणात अशा गोष्टींची वानवाच असते.

Leave a Comment