स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी, मायबोली मराठी दिन आणि जागतिक विज्ञान दिन हे तीन दिवस लागोपाठ आलेले आहेत. हा निव्वळ योगायोग आहे. परंतु आपल्या आयुष्यात या योगायोगाला विशेष महत्व आहे. कारण सावरकरांची पुण्यतिथी आणि विज्ञान दिवस यांच्या मध्यभागी मराठी दिवस आलेला आहे. मराठी भाषेचे उन्नयन करण्यासाठी सावरकरांनी भाषाशुद्धीची मोहीम सुरू केली. त्याचबरोबर मराठी भाषा ही जागतिक भाषा व्हावी यासाठी तिच्यातून वैज्ञानिक संशोधन केले गेले पाहिजे, असेही त्यांनी प्रतिपादन केले. पण मराठी माणसाला विज्ञानात आघाडीवर रहायचे असेल तर त्याला आपल्या जीवनाचा दृष्टीकोन वैज्ञानिक केला पाहिजे.
जे विज्ञानाने सिद्ध होईल तेच मी माझ्या आयुष्यात स्वीकारेन, अशी प्रतिज्ञा करून माणसाने जगले पाहिजे. भोळसटपणा, अंधश्रद्धा, देवावर नको एवढे विसंबून राहण्याची प्रवृत्ती, जग बदलले तरी कालबाह्य रुढींना कवटाळून बसण्याची गतानुगतिकता या दुर्गुणांचा आपण जोपर्यंत त्याग करत नाही तोपर्यंत आपले आयुष्य विज्ञाननिष्ठ होऊ शकत नाही. असा सावरकरांच्या आयुष्याचा सिद्धांत होता आणि हिंदू समाज सबल तसेच प्रभावी व्हायचा असेल तर त्याला विज्ञाननिष्ठ झालेच पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले होते. त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीला जोडूनच विज्ञान दिवस येतो खरा, परतु या विज्ञान दिवसाला कोणीही सावरकरांची आठवण काढत नाही. त्यांचा विज्ञानवादी दृष्टीकोन कसा आवश्यक आहे असे प्रतिपादनही कोणी करत नाही.
आपल्या समाजात आज अंधश्रद्धांचा फार बुजबुजाट झालेला आहे. हातचलाखी करून भोळ्या भाबड्या लोकांना फसवून त्यांच्या विचारविश्वावर आपला पगडा बसवणार्यास भोंदू साधूंचा सुळसुळाट झाला आहे. या साधूंनी धर्माला आपले बटिक बनवले असून त्याच्यातून आपल्या मठा-मंदिरांसाठी करोडो रुपयांच्या मालमत्ता कमवायला सुरुवात केली आहे. समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढलेले असूनही लोकांच्या धार्मिक अंधश्रद्धांना ऊत आला आहे ही एक विसंगती आज प्रकर्षाने जाणवत आहे. देवासमोर प्राण्याचा बळी दिला म्हणजे देव आपल्याला पावतो आणि तो इच्छित मनोकामना पूर्ण करतो ही कल्पना अजून अडाणी लोकांच्या मानगुटीवर बसलेली आहेच. परंतु चांगले शिकले सवरलेले लोकसुद्धा या अंधश्रद्धांना बळी पडत आहेत. महाविद्यालयांमध्ये जाऊन उच्च शिक्षण घेणारे शिक्षित लोक सुद्धा आपल्या जीवनातले प्रश्न स्वतःच्या बळावर सोडवू शकत नाहीत. त्यामुळे ते मठा-मंदिरात गर्दी करत आहेत.
अशा लोकांच्या मंदिरासमोर लागलेल्या रांगा पाहिल्यानंतर आपल्या शिक्षणाचे वैय्यर्थ प्रकर्षाने जाणवायला लागते आणि मन अस्वस्थ होते. आपल्या जीवनामध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मोठा वापर केलेला आहे. त्यांच्या वापराने आपल्या भौतिक जीवनामध्ये मोठे परिवर्तन आलेले आहे. आपले राहणीमान सुधारले आहे. एका बाजूला आपण हे परिवर्तन स्वीकारत आहोत, विज्ञानाचा फायदा घेत आहोत. परंतु दुसर्या् बाजूला आपला जीवनविषयक दृष्टिकोन मात्र विज्ञानाशी फारकत घेणारा आहे. आपण विज्ञानवादी दृष्टीकोनाने जगत नाही. त्यामुळे आपले जीवन म्हणजे अनेक अंधश्रद्धा आणि कालबाह्य रुढींचे गाठोडे झाले आहे.
मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, ज्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानात पराकोटीची प्रगती केलेली आहे त्या लोकांनी आपल्या जीवनात सुद्धा विज्ञान उतरवले म्हणून ते प्रगती करू शकलेले आहेत. आपण मात्र जीवनात विज्ञान उतरवत नाही. त्यामुळे आपण विज्ञानात पुढे जात नाही, तंत्रज्ञानात प्रगती करू शकत नाही. परिणामी आपण विज्ञानाचे संशोधक न होता विज्ञानाने निर्माण केलेल्या साधनांचे केवळ ग्राहक झालो आहोत. जे आपल्या आयुष्यात विज्ञान उतरवतात तेच जगावर राज्य करू शकतात. आपल्यासारख्या अज्ञानी आणि विज्ञानपराङ्मुख लोकांच्या छाताडावर पाय देऊन ते त्यांच्यावर हुकमत गाजवतात.
पाच लाख इंग्रज सातासमुद्रापलीकडून भारतात येतात आणि दीडशे वर्षे ३० कोटी भारतीयांना गुलाम करून त्यांची यथास्थित लूट करतात ही किमया जीवनात विज्ञान उतरवल्यामुळेच त्यांना शक्य झाली. आपण मात्र देवाला अभिषेक करत बसलो, धार्मिक उत्सवात वेळेचा अपव्यय करत बसलो, अभिषेक, जयंत्या, ब्राह्मणभोजने, सदावर्ते, मंदिरांचे जीर्णोद्धार, पालख्यांच्या मिरवणुका, रथोत्सव यामध्ये आपण आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानली. जग मात्र विज्ञानाची कास धरून आपल्या पुढे गेले.
या गोष्टीतून आपण काही शिकायला तयार नाही. आपण जर असेच विज्ञानविन्मुख राहिलो तर अजूनही आपली अवस्था दैन्यवाणी राहणार आहे. हे सावरकरांनी परोपरीने सांगितले आहे. सावरकरांच्या विज्ञानविषयक निबंधांतून विज्ञानाची महती गायिली गेलेली आहे. आपण त्यापासून काही तरी शिकले पाहिजे आणि निसर्गाला आपला गुलाम करण्यासाठी आपल्या बुद्धीमत्तेचा पराकोटीचा वापर केला पाहिजे. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक कार्यक्रम होत आहेत. त्यांच्या क्रांतीकार्याचे स्मरण केले जात आहे. परंतु त्यांच्या विज्ञान विषयक दृष्टीकोनाचे मात्र विस्मरण होत आहे, ही मोठी खेदाची बाब आहे.