
मुंबई: पक्षात बंडखोरी करून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढविणाऱ्या बंडखोरांना यापुढे पक्षात स्थान असणार नाही; असे सांगत पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना शिस्तीचे पाठ पढविले.
सन २०१४ च्या निवडणुका लक्षात घेऊन पक्षबांधणी करण्याच्या दृष्टीकोनातून पक्षात नुकतीच बढती मिळालेले राहुल मुंबईच्या दौर्यावर आहेत. यावेळी पक्षाचे अधिकाधिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना भेटण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
आतापर्यंत बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात पुन्हा सामावून घेतले जात होते. त्यांची सत्तास्थानी किंवा पक्ष संघटनेत पुनर्प्रतिष्ठापना केली जात होती. मात्र पक्ष संघटनेत शिस्त अत्यावश्यक असून यापुढे बंडखोरांना स्थान असणार नाही; असे राहुल यांनी बजावले.
एकीकडे उपाध्यक्ष शिस्तीचे महत्व कथन करीता असताना उपस्थित कार्यकर्त्यांनी मात्र त्यांना पक्षातील बेदिली आणि गटबाजीचे दर्शन घडविले. महाराष्ट्राचे प्रभारी असलेले मोहन प्रकाश यांच्याविरूद्ध केवळ तक्रारीच केल्या असे नव्हे तर घोषणाबाजीही केली. मुख्यमंत्री महामंडळावरील नियुक्त्या करंत नसल्याची अनेकांची तक्रार होती.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवरही अनेकांनी नाराजी वुअक्त केली. त्यात मंत्री वर्ष गायकवाड आणि खासदार एकनाथ गायकवाड यांचाही समावेश आहे. धारावी येथील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेला विलंब लागत असल्याबाबत त्यांनी गाऱ्हाणे मांडले.
त्यावर राहुल यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. सध्याच्या पद्धतीने पुनर्विकास केल्यास त्यात खाजगी बांधकाम व्यावसायिकांचा फायदा होत असून स्थानिक झोपडवासीयांच्या पदरात फारसे काही पडणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांना समजावले. त्यामुळे ‘म्हाडा’च्या मार्फत हे काम करण्याचे नियोजन असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे रिक्त असलेल्या मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावर नेमणूक करण्याबाबत लवकरंच निर्णय घेऊ; असे राहुल यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.