हैदराबाद – राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत असलेल्या दुस-या कसोटीत सुरुवातीलाच टीम इंडियाने कांगारुना चार धक्के देत अडचणीत आणले आहे. या धक्क्यानंतर मॅथ्यू वेड आणि मायकल क्लार्कने मैदानावर टिकून डाव सावरला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा ऑस्ट्रेलियाने चार गडी गमावत १४९ धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क दुस-या कसोटीत नाणेफेकीत लकी ठरला. त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र टीम इंडियाने त्याचा हा निर्णय फेल ठरविला. तरुण गोलंदाज भुवनेश्वरकुमारने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. त्याने पहिला बळी डेव्हिड वॉर्नरच्या रुपाने घेतला. सामन्याच्या तिस-याच षटकात त्याने वॉर्नरचा त्रिफळा उडविला. त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ५ धावा जोडल्या गेला नाही तर भुवनेश्वरने दुसरा सलामीचा फलंदाज कोवानलाही पायचित केले. वॉर्नर ६ आणि कोवान ४ धावा काढून तंबूत परतले.
भुवनेश्वरकुमारने भारताला तिसरे यश मिळवून दिले आहे. शेन वॉटसनला त्याने पायचित केले. २३ धावा काढून वॉटसन बाद झाला.त्यानतर ऑफ स्पिनर आर. अश्विनने फिलिप ह्यूजला बाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले. चेन्नई कसोटी सामन्यात १२ गडी बाद करणा-या अश्विनने ह्यूजला कर्णधार धोनीकरवी झेल बाद केले. पहिल्या प्रयत्नात धोनीला झेल घेता आला नाही मात्र, त्याने दुस-यांदा ती चुक होऊ दिली नाही. ह्युज १९ धावांवर बाद झाला.
सुरुवातीच्या चार धक्क्यानंतर मॅथ्यू वेड आणि मायकल क्लार्कने डाव सावरला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा ऑस्ट्रेलियाने चार गडी गमावत १४९ धावा केल्या होत्या. कांगारूची सारी मदार या जोडीवर आहे. पहिल्या कसोटीतही कर्णधार क्लार्कने डाव सावरला होता.