७० वर्षीय वृद्धाचा अस्वलाशी सामना; दोघांचाही मृत्यू!

बुलडाणा: अस्वलाशी झालेल्या सामन्यात एका ७० वर्षीय वृद्धाचा आणि अस्वलाचाही मृत्यू झाल्याची घटना बुलडाण्यात घडली. ज्ञानगंगा अभयारण्यात ही घटना घडली.

चरण्यासाठी म्हणून निघालेली गाय तीन दिवस झाले तरी परत आली नाही; म्हणून वरवंडचे रहिवाशी असलेले ज्ञानदेव शेळके हे ७० वर्षीय गृहस्थ तिच्या शोधासाठी बाहेर पडले. शोध घेता घेता ते ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचले. त्यावेळी त्यांच्यावर एका अस्वलाने हल्ला केला. यावेळी शेळके यांनी त्यांच्याकडे असलेल्या कुर्‍हाडीने या अस्वलाचा सामना केला. अस्वलाच्या हल्ल्यात शेळके गंभीर जखमी झाले तसेच त्यांच्या हातातील कुर्‍हाडीचा वार अस्वलावर झाला. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.

दोन दिवस उलटल्यानंतरही शेळके परत न आल्याने जंगलामध्ये त्यांचा शोध सुरु झाला आणि त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. हे जंगल अभयारण्य असल्याने वन्यजीव विभागाच्या अखत्यारीत येते; तर विभागाचे कार्यालय हे अकोला येथे असल्याने जंगलामध्ये कोणीही मुक्त संचार करत असतो. त्यावर कुणाचाही अंकुश नाही. त्यामुळे वन्यजीव विभागाचे कार्यालय बुलढाण्यात होणं गरजेचं आहे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.