भटकळ बंधूंचा पत्ता – डिफेन्स कॉलनी, कराची

भारतीय इंटेलिजन्स ब्युरोने २००५ सालापासून भारतात डझनावारी झालेल्या बॉम्बस्फोटात हात असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या रिझाय व इक्बाल भटकळ या भावांचा पत्ता खणून काढण्यात यश मिळविले असून हे दोघेही पाकिस्तानातील कराची येथे दहशतवाद्यांसाठी मुद्दाम उभारण्यात आलेल्या सुसज्ज डिफेन्स हौसिंग कॉलनीत राहात असल्याची खात्री करून घेतली आहे. ही कॉलनी प्रामुख्याने भारतातील मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांना संरक्षण देण्यासाठीच उभारली गेली आहे.

रियाझ भटकळ याने यापूर्वी शारजा येथे आश्रय घेतला होता तर त्याचा भाऊ इक्बाल हा सौदीत होता. तेथेच त्याची गाठ अबू जुंदाल आणि फारूक काझी यांच्याशी पडली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून गल्फ देशांबरोबर भारताचे संबंध सुधारले असल्याने या दोन्ही भावांसाठी हे देश सुरक्षित राहिलेले नाहीत असे लक्षात आल्यावर त्यांना कराचीला हलविले गेले आहे असे गुप्तवार्ता विभाग आणि रॉ च्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

भारताने पाकिस्तानकडे सर्वाधिक वाँटेड म्हणून अतिरेक्यांची जी यादी दिली आहे त्यात हे दोघे बंधू फारच वरच्या स्थानावर आहेत. या दोघांनाही १२ नोव्हेंबरला वरील पत्त्यावर आणले गेले आहे. मात्र अशा प्रकारे इंडियन मुजाहिद्दीनच्या सदस्यांना या कॉलनीत आणण्याची ही पहिलीच वेळ नाही असेही सांगण्यात आले आहे. यापूर्वीही रियाझने येथे आश्रय घेतलेला होताच मात्र नंतर त्याला इंडियन मुजाहिद्दीन संघटनेसाठी सदस्य भरती करता यावी म्हणून शारजात पाठविण्यात आले होते.

दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या इंडियनच्या सदस्यांनीही रियाझ अनेकदा भारतात आल्याची कबुली दिली आहे. इंडियन मुजाहिद्दीन ही संघटना पाकिस्तानी दहशतवादी संघटनांसाठी अतिशय महत्त्वाची आहे कारण त्यामुळे भारतात स्थनिक पातळीवरच दहशतवादी कारवाया करणे त्यांना सोपे जाते आहे असेही गुप्तवार्ता विभागाचे म्हणणे आहे.

Leave a Comment