भारतीय पोपटांचा युरोपियन फळबागांना धसका

युरोपियन फळबाग मालकांना सध्या भारतीय शत्रूचा सामना करताना अक्षरशः नाकेनऊ आले असल्याची खबर आहे. हा भारतीय शत्रू आहे आपला राघू किवा पोपट.

युरोपियन पर्यावरण संस्थेने केलेल्या पाहणीत असे आढळून आले आहे की भारतातून मुद्दाम आणण्यात आलेले किवा जाणीवपूर्वक पाठविले गेलेले लाल कंठाचे हे राघू अतिशय उपद्रवी असून त्यांनी येथे अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक फळबागा त्यांनी उध्वस्त केल्या असून त्यामुळे वाईनचे उत्पादन एकदमच घटले आहे.

बेल्जियमपासून ते युनायटेड किंगडम, पश्चिमेकडील ग्रीस, स्लोव्हेनिया, नेदरलँडस, तसेच इस्त्रायल तुर्कस्थान अशा युरोपिय संघातील किमान १२ देशंना या पोपटांचा सामना करावा लागत आहे. हे पोपट पाडावर आलेली सफरचंदे, पिअर, चेरी तसेच प्लमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. कांही काळापूर्वी हे पोपट पिंजऱ्यातील पक्षी म्हणून युरोपात आणले जात असत. १९६० ते १९७० या काळात या प्रकारे अनेक पोपट वरील देशातून आणले गेले आहेत. त्यातील कांहींनी पिंजऱ्यातून सुटका करून घेतली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या पोपटांनी भारत आणि पाकिस्तानातही मका, ज्वारी. डाळी या कृषी उत्पादनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. तशी आकडेवारीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकेकाळी तर या पिकांची  सुमारे ८१ टक्के नासाडी या पोपटांनी केल्याचेही सांगितले जात आहे. परिणामी युरोपिय देशांनी या पोपटांवर कायद्याने बंदी आणावी अशी मागणी केली आहे. या पोपटांमुळे पोल्ट्रीला बाधा आणणाऱ्या रोगांचाही प्रसार होतो असेही पर्यावरण संस्थेचे म्हणणे आहे.

Leave a Comment