कॅमेरून यांच्या पूर्वजांकडेही होते गुलाम

लंडन दि.२८ -ब्रिटीश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचे पूर्वज गुलाम मालक होते आणि गुलामगिरीचा कायदा संमत झाल्यानंतर मालमत्तेचे नुकसान झाल्यापोटी ब्रिटन सरकारने त्यांना नुकसान भरपाईही दिली होती असे डेटाबेसवरून सिद्ध झाले आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथील संशोधकाच्या एका तुकडीने केलेल्या संशोधनात ही बाब उघड झाली आहे.

१९ व्या शतकात गुलामगिरी जोरात होती. त्यावेळी गुलामांच्या व्यापारात गुंतलेले आणि पदरी गुलाम बाळगणारे गुलाम मालक यांच्यासंबंधीची सर्व कागदपत्रे या संशोधकांनी तपासली. १८३३ साली ब्रिटीश कॉलनीज मधली गुलामगिरीची प्रथा बंद केल्याबद्दल गुलाममालकांना नुकसान भरपाई देण्यात आली होती. त्यात काही ठळक नांवे आहेत. लेखक जॉर्ज आर्वेल, कादंबरीकार ग्रॅहम ग्रीन यांच्याबरोबरच कॅमेरून यांच्या पूर्वजांचे नांवही या यादीत आहे असे संशोधन प्रमुख कॅथरिन हॉल हिने म्हटले आहे. ही यादी सर्वसामान्यांनाही उपलब्ध करून देण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले.

त्यावेळी ब्रिटीश सरकारने गुलाम मालकांना दिलेल्या नुकसान भरपाईची रक्कम २० दशलक्ष पौंड इतकी होती. आजच्या बाजारभावाने ही किमत होते १.८ अब्ज पौंडस. ही रक्कम त्यावेळच्या ब्रिटीश सरकारच्या बजेटच्या ४० टक्के इतकी होती आणि ४६ हजार गुलाम मालकांनी या नुकसान भरपाईसाठी दावे केले होते असेही या कागदपत्रांतून आढळले आहे. १६ व्या शतकापासून आफ्रिकेतून गुलाम आणण्याची प्रथा सुरू होती आणि १८०६ सालात अमेरिका, कॅरेबियन येथे सुमारे १२.५ दशलक्ष गुलाम आफ्रिकेतून आणले गेले होते असेही कॅथरिन यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment