वॉशिग्टन दि.२८ – मंगळावर नासातर्फे सोडण्यात आलेल्या क्युरिऑसिटी या रेाव्हरने मंगळावरील खडकांत ड्रील करून तेथील खडकांची पूड गोळा केल्याचे पक्के पुरावे यानाच्या फोटोवरून मिळाले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आजपर्यंत नासाने सोडलेल्या कोणत्याही रोव्हरने परग्रहावरील खडकांत ड्रील करून तेथील नमुने मिळविले नव्हते त्यामुळे अशी सँपल गोळा करणारे क्युरिऑसिटी हे पहिलेच रोव्हर आहे.
क्युरिऑसिटीच्या ड्रील सिस्टिम विभागाचे इंजिनिअर स्कॉट मॅक्लोसी म्हणाले की यासाठी आम्ही गेली कित्येक वर्षे सातत्याने मेहनत करत आहोत. क्युरिऑसिटीने यशस्वीपणे ड्रील केल्याची अंतिम खात्री फोटोवरून पटली असून त्यामुळे आमची उमेदही वाढली आहे. या यानावर असणार्या विविध प्रकारच्या दहा अॅनॅलेटिकल यंत्रणांकडे आता हे नमुने तपासणीसाठी जातील आणि त्यातून कधीकाळी मंगळावर जीवसृष्टी होती वा कसे यासंबंधी संशोधन करून माहिती मिळेल.
क्युरिऑसिटीने मंगळावर अडीच इंच जाडीचे छिद्र ८ फेब्रुवारीलाच केले होते मात्र नुकत्याच मिळालेल्या फोटोतूनच क्युरिऑसटीच्या यंत्रहातातील खडकांची पूड स्पष्टपणे दिसली असल्याचे सांगण्यात येत आहे.