पुन्हा अनुभवला जाणार ‘टायटॅनिक’ प्रवासाचा थरार

न्यूयॉर्क: जगप्रसिद्ध दुर्दैवी टायटॅनिक जहाजाची नवीन प्रतिकृती साकारण्याचा ध्यास ऑस्टेलियातील स्लिव्ह पामर या गर्भश्रीमंत व्यक्तीने घेतला असून सन २०१६ पर्यंत ती साकार होईल. या टायटॅनिक- २ मधून प्रवासी मूळ टायटॅनिकच्या मार्गाने आणि त्याच थाटाने प्रत्यक्ष प्रवासाचा थरार अनुभवणार आहेत.

न्यूयॉर्क मधील एका संग्रहालयात टायटॅनिक जहाजाच्या ब्लूप्रिंटचे अनावरण स्लिव्ह पामर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी टायटॅनिक जहाजाच्या घटनेतून बचावलेल्या मार्गारेट मॉली ब्राऊन यांच्या नात हेलेन बेनझिगर उपस्थित होत्या.

पामर यांनी याबाबत अधिक माहिती दिली की; या नवीन जहाजाची बांधणी चीनमध्ये लवकरंच सुरु करण्यात येणार आहे. या जहाजाचा प्रवास मूळ टायटॅनिक सारखाच म्हणजेच साऊथएम्पटनपासून, इंग्लंड ते न्यूयॉर्क असणार आहे. यात सफर करण्यासाठी ४० हजार लोकांनी उत्सुकता दर्शविली आहे.

मूळ टायटॅनिक त्या काळात जगातील सर्वात मोठे आणि प्रशस्त जहाज होते. जेव्हा ते १५ एप्रिल १९१२ रोजी उत्तर अटलांटिकमध्ये हिमनगाला धडकले आणि बुडाले तेव्हा २ हजार २०० पेक्षा अधिक प्रवाशांपैकी फक्त ७०० लोकांना वाचविण्यात यश आले. याचे कारण म्हणजे जहाजात लाईफबोटी पुरेशा नव्हत्या. ही घटना इतिहास प्रसिद्ध झाली.

पामर पुढे म्हणाले की, टायटॅनिक जलसमाधीच्या वेळी दुर्दैवाने हवामानात बदल झाला होता. आता तसे होऊ नये अशी आशा आहे. जागतिक तापमान वाढीचा एक फायदा होणार आहे की; ह्या दिवसात उत्तर अटलांटिकवर जास्त हिमनग नसतील. प्रतिकृती असलेल्या जहाजावरील प्रवासी त्या काळात फॅशनचे कपडे परिधान करतील आणि टायटॅनिकप्रमाणेच जेवणाची खोली, त्या काळातील मेनूपासून सर्व तसेच असेल, असे पामर यांनी सांगितले.

बेनझिगर या टायटॅनिक- २ च्या सल्लागार मंडळावर काम करण्यास तयार झाल्या आहेत.
मर्क्यू कॅनेर्व्हा हे डेल्टामरिन टायटॅनिक-२ उभारणार्‍या जहाज बांधणी कंपनीचे विक्री संचालक आहेत. ते म्हणाले की; मूळ जहाजात कोळशाच्या इंधनाचा वापर केला गेला होता. आताच्या जहाजात डिझेलचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे आधुनिक नौकानयन आणि सुरक्षा मिळणार आहे.

या जहाज बांधणीकरिता पामर यांनी स्वतः निधी दिला असून तो त्यांनी त्यांच्या रिअल इस्टेट आणि कोळशाच्या व्यापारामधून उभारला आहे. ऑस्ट्रेलियाच्या बीआरडब्ल्यू या मासिकाने या जहाजाकरिता ४ अब्ज कोटी रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

Leave a Comment