कर्करोग अधिक घातक; की दहशतवाद?

विख्यात कर्करोगतज्ज्ञ डॉ. चेतन देशमुख एका रुग्णाला सल्ला देत होते की; या अतिगंभीर आणि घातक रोगात रुग्णाने जुन्या सवयी, वृथा अहंकार विसरून स्वत:ला उपचारांच्या स्वाधीन केल्यास ते अधिक परिणामकारक व यशस्वी होतात. रुग्णांचे या बाबतीत सहाय्य असणे आवश्यक असते.

त्यांचे समुपदेशन कानातून थेट मनाला भिडले. गुप्तहेर खात्यातील कारकीर्दीत पंजाबमधील दहशतवाद आणि उत्तरपूर्वेतील बंडखोरीच्या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर साहजिकच कर्करोग व दहशतवाद यात अधिक घातक कोण; याची तुलना होणे स्वाभाविकंच! अखेर ठाम पटले की दहशतवाद हा कर्करोगापेक्षा अनेक पटीने घातक असतो. या तुलनेची सविस्तर चिकित्सा-

१) कर्करोग हा निसर्गाने रुग्णाला दिलेला शाप असतो. रुग्ण हाच त्याचा एकमेव शत्रू! दहशतवाद मात्र शत्रुदेशाने भारताविरुद्ध केलेला छुपा हल्ला! दहशतवाद ही एका संपूर्ण देशाला नामोहरम करण्याची कुटील मोहीम असते. आधुनिक युगात उघड युद्ध आर्थिक दृष्ट्या न परवडणारे असल्याने या गनिमी मार्गाचा उपयोग करणे जास्त सोइस्कर ठरते. शिवाय मदतीला त्या देशांतील छुपे हस्तक (स्लीपर सेल) असतात हे वेगळेच! भुट्टोंच्या वल्गना आठवा. ते म्हणायचे की; भारताला हजार ठिकाणी चिरे देऊन रक्तबंबाळ करू’.

२) कर्करोगात उपचार सर्वस्वी डॉक्टरांच्या अधिकारात असतात. उपचारांसाठी त्यांना जागतिक तज्ज्ञांचे, आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि समाजसेवी संस्थांचे भरघोस सहाय्य मिळ्ते. या उलट दहशतवादाचा भारत अनेक दशके एकहाती सामना करीत असून अनेक पाश्चात्य देश मदत करणे तर सोडाच; केवळ वरपांगी सहानुभूती दाखवित आले. इतर देशांत दहशतवादाचे बीज पेरणार्‍या अमेरिकेला ९/११ नंतर या धोक्याचा साक्षात्कार झाला.

३) कर्करोगाचा उपचार करणार्‍या तज्ज्ञ मंडळींच्या समोर एकच लक्ष्य असते; रुग्णाचे प्राण वाचवणे! ही मोहिम बिनविरोध असते. आपल्या बाबतीत लक्ष्य जरी दहशतवादाचा बिंमोड करणे हे असले तरी त्यात ठामपणा किंवा एक विशिष्ट सुनियोजित व कायमस्वरूपी युद्धनीतीचा व राजकीय सर्वसंमतीचा जरा अभावच पहावयास मिळतो.

आता मानवाधिकाराच्या बाबतीत अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे स्पष्ट विचार बोध घेण्यासारखे आहेत. संपूर्ण अमेरिका तेव्हा यादवी युद्धाने ग्रासलेला होता. एकसंध देश म्हणून त्याचे अस्तित्वंच धोक्यात होते. २२ ऑगस्ट १८८२ रोजी हॉरेस ग्रिली यांना लिहिलेल्या पत्रात लिंकन यांनी आपली नीती ठामपणे मांडली आहे; त्याचा हा सारांश:

’माझ्या धोरणाबद्दल मी कोणालाही भ्रमात ठेऊ इछित नाही. ते धोरण म्हणजे एकसंध अमेरिकेचे रक्षण करणे! मग त्यासाठी कोणतेही अप्रिय, निर्धृण व कठोर उपाय करावे लागले तरी मी ते हमखास करीन. मग देशातील गुलामगिरी संपूर्ण, किंवा अंशत: नष्ट झाली काय अथवा मुळीच नष्ट न झाली तरी बेहतर! देश अखंड ठेवण्यासाठी मनाची खात्री पटल्यास मी माझे धोरण वेळोवेळी बदलण्यास मागे पुढे पाहणार नाही. अंतत: सर्व मानव समानतेचा हेतू साध्य करणे हेच माझे द्येय असेल.’

अमेरिका समर्थ आणि एकसंघ राहिला तो लिंकन यांच्यामुळे. ‘निश्चयाचा महामेरू’ म्हणजे लिंकन खरे ना? आपल्या देशास असा महामेरू कधी लाभणार?

कर्करोगाच्या उपचारात मुख्य हल्ला बाधित पेशींवर केला जातो. त्या प्रयत्नात कांही चांगल्या पेशींचेही बळी पडतात. मात्र त्याला पर्याय नसतो; कारण अंतिम ध्येय फारच मोठे असते. सुक्याबरोबर थोडे ओलेही जळणारंच हे सत्य लक्षात ठेवा. मग हा न्याय दहशतवादाच्या बाबतीत कां लावू नये? न्यायशास्त्रात ’चॉईस ऑफ ईव्हिल्स’ चे स्पष्ट प्रावधान आहे. दहशतवादी हल्ल्यात शेकडो निरपराध बळी पडतात. सुरक्षादलांतील हुतात्म्यांची तर रास लागते. ते चालते पण मोहिमेत एखाद दुसरा संशयित मारला गेला तर मानवाधिकार विभागाची बोंब कितपत ग्राह्य आहे?

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात अनेक कारणांवरून आंतरिक वादविवाद, असंतोष आणि तीव्र आंदोलनें भडकण्यास भरपूर वाव आहे. महागाई, भ्रष्टाचार व कुशासनाने हैराण झालेल्या जनतेचा आता संयम सुटलेला आहे. अशा संधीचा शत्रू फ़ायदा न घेईल तरच नवल! पंजाब, उत्तर पूर्वेतील बंडखोरी व नक्षलवाद ही त्याचीच ज्वलंत उदाहरणें आहेत. दहशतवाद आता आपल्याला झेपण्यासारखा कर्क रोग नाही. या रोगाला अविलंब नष्ट करण्याशिवाय गत्यंतर नाही.

ही समस्या मेण बत्ती मोर्चे, जाहीर शोक, धिक्कार सभा व उपोषणें करून सुटणारा नाही. गरज आहे ती सर्वसमावेशक राजकीय सहमतीची! य़ुद्धप्रसंगी पूर्ण देश एकवटलेला आपण अनुभवला आहे. दहशतवाद हे आधुनिक युगातील महायुद्ध, आक्रमणंच समजावे. खालील कार्यसूत्री विचारात घेण्यासारखी वाटते.

अ) या विषयावर राष्ट्रीय पातळीवर सहमती साठी संसदेचे स्वतंत्र सत्र बोलवावे
ब) दहशतवाद हा एकमेव शत्रू समजून राजकीय मतभेद बाजूला ठेऊन सहमती व्हावी
क) दहशतवाद विरोधी कायद्यांच्या राजनैतिक गैरवापरावर लगाम असावा व ढवळाढवळ बंद करावी ड) सुरक्षादलांना पुरेशी मोकळीक देत त्यांच्या मोहीमा आणि कारवायांवर कडक नजरही असावी
इ) मानवाधिकाराचे स्तोम स्वच्छ प्रशासनावर केंद्रीत करावे. प्रत्यक्ष युद्धात मानवाधिकारावर आपसूकचा आळा असतो लक्षात ठेवा.
फ़) पुढील हल्ल्याची वाट बघून नंतर केवळ प्रसाधनिक डागडूजी करण्याची विलासी सवय सोडावी. ती वेळ गेली.

गृहपाठ जरा लांबलचक व कठिण आहे खरे पण अशक्य नक्कीच नाही.

कर्करोग तसा आधुनिक आजार आहे. भारताला दहशतवाद नवा नाही. मग आत्ताच ही तुलना करण्याचे प्रयोजन काय; हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. स्वानुभवाने केलेले लिखाण अधिक परिणामकारक असते. माझ्या बाबतीत स्वानुभव म्हणजे सुरुवातीला उल्लेख केलेला रुग्ण मी स्वत:!

विद्याधर वैद्य
निवृत्त निदेशक
इंटेलिजन्स ब्यूरो,
नवी दिल्ली

Leave a Comment