नवी दिल्ली: दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदिन यांनी आता उद्योग जगताला लक्ष्य केले आहे. या संघटनेने देशातील प्रमुख उद्योगपती; रिलायन्सचे मुकेश अंबानी यांना धमकीचे पत्र पाठविले आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अंबानी यांनी पाठिंबा देऊ नये; अन्यथा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला इजा पोहचविली जाईल; अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे.
यापूर्वीही अंबांनी यांना गुजरातमध्ये गुंतवणूक न करण्याबाबत धमकीचे पत्र आले होते. रविवारी त्यांच्या नरिमन पॉईंट येथील मेकर चेंबर्सच्या कार्यालयात एक पत्र मिळाले. हे पत्र घेऊन येणार्या अनोळखी व्यक्तीचा तपास करण्यात येत आहे. रिलायन्सचे उपाध्यक्ष एस पी नंदा यांनी याबाबत माहिती दिली की; पत्र पाठविणार्याने अंबांनी यांना धमकी दिली आहे आणि मोदी यांना पाठिंबा देऊन त्यांनी तेथील अल्पसंख्यांक लोकांची मने दुखावली आहेत. याची शिक्षा त्यांना मिळणार आहे. याबाबत मुंबई गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.
तपासासाठी अंबानी यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्राथमिक तपासात पोलिसांना पत्रावर दनिश असे लिहिलेले निष्पन्न झाले आहे. यावरून अंदाज वर्तविला जात आहे की; गेल्या वर्षी बिहारचा रहिवासी दनिश अन्सारी याने काही अतिरेक्यांची राहण्याची सोय केली होती. हा तोच असावा काय; असा कयास पोलीस लावित आहेत.