जेटलींचा फोन टॅप करण्यावरून राज्यसभेत हंगामा

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील नेते अरूण जेटली यांचे फोन टॅप केले जात असल्याच्या कारणावरून राज्यसभेत बुधवारी विरोधी सदस्यांनी जोरदार हंगामा केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

बुधवारी सकाळी कामकाज सुरू होताच समाजवादी पक्षाचे नरेश गोयल यांनी हा विषय उपस्थित केला. हा गंभीर मामला असून त्या प्रकरणी सरकारने निवेदन करावे अशी मागणी त्यांनी केली. हा विषय बहुजन समाज पक्षाच्या सदस्यांनीही उचलून धरला. त्या पाठोपाठ संयुक्त जनता दलाचे शिवानंद तिवारी यांनी फोन टॅपिंग प्रकरणाचा निषेध करून गृहमंत्र्यांनी या प्रकरणात निवेदन करावे अशी मागणी केली.

याच काळात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्यानंतर संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला म्हणाले की; हे प्रकरण खरेच गंभीर असून सरकारने त्याची चौकशी करण्याचा आदेश या आधीच दिला आहे. दिल्ली पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत असून काही जणांना या प्रकरणात अटकही करण्यात आली आहे. स्वत: जेटली यांनाही या प्रकरणाची माहिती आहे. परंतु शुक्ला यांच्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही त्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्याने अध्यक्ष अन्सारी यांनी कामकाज तहकुब केले.

कामकाज पुन्हा सुरू होताच नरेश गोयल यांनी या प्रकरणी गृहमंत्र्यांनी निवेदन करावे असा आग्रह धरला. त्यावर अध्यक्षांनी असा निर्णय दिला की; सभागृहाच्या आजच्या कामकाजाची कार्यक्रम पत्रिका निश्चित आहे. त्यात आता जादा कामकाज घालता येणार नाही. या प्रकरणी शुक्ला यांनी केलेले निवेदन पुरेसे आहे.

त्यानंतर भाजप सदस्यांनी गोंधळ सुरू केला. पक्षाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी ज्या नेत्यांचे फोन टॅप केले जात आहेत त्यांची नावे गृहमंत्र्यांनी जाहीर करावीत; अशी मागणी केली. कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा यांनीही गृहमंत्र्यांनी निदवेदन केले पाहिजे असा आग्रह धरल्यावर गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हस्तक्षेप करून सांगितले की; सरकारला या प्रकरणात जे काही म्हणायचे आहे ते शुक्ला यांनी सांगितले आहे त्या खेरीज सांगण्यासारखे सरकारकडे काहीही नाही.