कोलकत्यातील आगीत १८ जणांचा होरपळून मृत्यू

कोलकता – येथिल सेल्दाह भागातील सूर्यसेन मार्केटमधील एका सहा मजली कॉम्प्लेक्‍सला भीषण आग लागल्याने १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास नागरिक कॉम्प्लेक्सजवळ असलेल्या गोडाऊनमध्ये झोपले असताना ही आग लागली. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचे समजते. या कॉम्प्लेक्‍समध्ये प्लास्टिकच्या साहित्याची दुकाने आणि पेपर गोडाऊन असल्याने आग भडकल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थला भेट दिली.

पोलिस आयुक्त जावेद शमीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. त्यावेळी अनेक नागरिक इमारतीत झोपेले होते. या अचानक लागलेल्या आगीने १८ जनाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या इमारतीत तीस ते चाळीस जण असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. या आगीतून सहा जणांना बाहेर काढण्यात यश आले असून जखमींना कोलकात्यातील मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अग्निशामन दलाच्या २६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून, अजून कोणी आगीत अडकले आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे. ही आग नेमक्‍या कोणत्या कारणामुळे लागली याचा शोध घेण्यात येत आहे. ही इमारत अनधिकृत असून संबंधित अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे खान यांनी सांगितले.