लंडन दि.२६ – ब्रिटनचा फेव्हरिट ब्रँड ठरविण्यासाठी घेण्यात आलेल्या विविध वस्तूंचा समावेश असलेल्या सर्वेक्षणात लक्झरी वॉचमेकर रोलॅक्स कंपनीने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. या स्पर्धेत कंपनीने अॅपलला मागे सारून आपले नांव प्रथम क्रमांकावर कोरले आहे. या स्वीस कंपनीची आजही ब्रिटीश ग्राहकांना प्रचंड भुरळ असून कंपनीच्या उत्पादनांची गुणवत्ता, विश्वास आणि खास वैशिष्ठे त्यासाठी कारणीभूत आहेत.
एकूण १००० सुपरब्रँडसाठी हे सर्वेक्षण करण्यात आले त्यात अॅपलच्या आयफोनने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिसरे स्थान मायक्रोसॉफ्टकडे गेले असून यावर्षी मायक्रोसॉप्टने गतवर्षीच्या ४५ व्या क्रमांकावरून एकदमच तीन नंबरवर उडी घेतली आहे. फेसबुक प्रथमच या सर्वेक्षणात सामील करण्यात आले होते आणि त्यांना चौथ्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे.
सुपरब्रँड एक्स्पर्ट कौन्सिलचे स्टीफन चेलिऑटिस यांच्या मते ब्रिटनमधील ग्राहक दीर्घ काळ सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे हैराण झाला आहे. ही आर्थिक मंदी कधी संपणार याचा कांहीच अंदाज देता येत नसल्याने ग्राहक खरेदी करताना नवीन कांही विचार करण्याऐवजी आपल्या माहितीचे, खात्रीचे आणि दीर्घकाळ चाललेले ब्रँडच पसंत करत आहेत.