रेल्वेच्या तिकीट दरात छुपी वाढ

नवी दिल्ली: रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी संसदेत आज रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला. यात सरकारने मागच्या दाराने दर वाढ केली आहे. सामन्य प्रवासी भाड्यात थेट वाढ करण्यात आली नसली तरी तिकीट दरावरील अधिभाराच्या रुपाने ही वाढ करण्यात आली आहे. तिकीटावर यापुढे इंधन अधिभार लावण्यात येणार आहे. यामुळे डिझेल भाववाढीचा परिणाम यापुढे रेल्वेच्या तिकीटावरही दिसून येईल.

सुपरफास्ट गाडीच्या तिकीट दरातही वाढ करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे तत्काल तिकीटाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. रेल्वेच्या आरक्षण आणि कॅन्सलेशन दरात वाढ करण्यात आली आहे. इंटरनेटचे बुकिंग आता फक्त रात्री साडेअकरा ते साडेबारापर्यंतच बंद असणार आहे. उर्वरीत २३ तास ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

मुंबईत नव्या ७२ लोकल सुरू करण्यात येणार असल्या तरीही एकूणात रेल्वे बजेटमधून यावेळीही मुंबईकरांच्या पदरी निराशाच हाती लागली आहे. पश्चिम मार्गावरील काही लोकल्सला एसी कोच लावण्यात येणार आहेत. कर्जत-कल्याण दरम्यान तिसरी लाईनही टाकण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे.

रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी कोणत्याही नव्या रेल्वेमार्गाची घोषणा केली नाही. मात्र देशातील ४५० किलोमीटरचा नॅरो गेज मार्ग आता ब्रॉ़ड गेज करण्यात येणार आहे. यात नागपूर-नागभीड रेल्वेमार्गाचा समावेश करण्यात आला आहे. मनमाड-परभणी रेल्वेमार्गाचं दुपदरीकरण करण्यात येणार आहे.

रेल्वेत दीड लाख नोकर्‍या उपलब्ध असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं. महिला विशेष गाड्यांसाठी आता आरपीएफच्या महिला कॉन्स्टेबल असणार आहेत. यासाठी आरपीएफच्या भरतीत महिलांसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. महिला कर्मचार्‍यांसाठी काही ठिकाणी होस्टेल्स उभारण्यात येणार आहेत.

पवनकुमार बन्सल यांनी ६७ नव्या गाड्यांची घोषणा केली. यात २७ पॅसेंजर्स गाड्यांचा समावेश आहे. तसंच मुंबई-सोलापूर एक्स्प्रेस, बांद्रे टर्मिनस ते रामनगर एक्स्प्रेस आणि अजनी ते लोकमान्य टिळक एक्स्प्रेसची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली.