श्रीनगर: काश्मीरमध्ये एका उर्दू वृत्तपत्राने अतिरेकी अफजल गुरु याने लिहिलेले पत्र प्रसिद्ध केले आहे. अफजल गुरुने मृत्यूपूर्वी आपल्या बचावासाठी पत्र लिहिले होते. त्यामध्ये गुरुने नऊ जणांचा बळी घेणार्या संसदेवरील अतिरेकी हल्ल्याबद्दल आम्हाला अपराधीपणाची भावना वाटत नाही; असे नमूद केले आहे. वृत्तपत्र ‘कोमी वकारी’च्या संपादिका शबनम कायूब यांना गुरूने सन २००८ मध्ये पत्र पाठविले होते.
गुरुने संसदेत प्रवेश करून बेछूट गोळीबार करणार्या अतिरेक्यांना शस्त्र आणि निवासासाठी जागा पुरविण्याची सोय केली होती. त्याला गोपनीय रितीने दिल्लीतील तिहार तुरुंगात फाशी देऊन त्याचा मृतदेह दफन करण्यात आला. गुरुला योग्य न्याय मिळाला नाही असे बर्याच मानवाधिकार संस्थेने म्हटले आहे.गुरूच्या कुटुंबाला त्याच्या देहांताच्या योजनेचे पत्र त्याला फाशी दिल्यानंतर दोन दिवसांनी काश्मिर येथील सोपोर जवळील त्याच्या गावी मिळाले. यावरही मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
संसदेवरील हल्ल्यातील त्याच्या भूमिकेबद्दल या पत्रामुळे २००८ पासून नवीन वादात भर पडत आहे.
संपादिका शबनम कायूब म्हणाल्या; गुरुने लिहिले आहे की; ह्या अतिरेकी हल्ल्याची शरम वाटण्याचे कारण नाही. ज्या लष्करी पलटणीने काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन केले त्यांना या अपराधाची शरम वाटत नाही. संपादिकेने गुरुच्या लिखितावर दावा केला आहे की, संसदेतील हल्ला हा काश्मीर मुद्दयाशी संबंधित आहे. जर हे कटकारस्थान आहे तर दहशतवाद्यांचा संपूर्ण सशस्त्र प्रतिकार हे ही कटकारस्थान आहे.