डीएनए शोधाबद्दलचे नोबेल लिलावात विक्रीला

आज विज्ञानात डीएनए रेणूमुळे ऐतिहासिक क्रांती झाली आहे. १९६२ साली प्रथम या रेणुचा शोध लावल्याबद्दल नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या फ्रान्सिस क्रीक या संशोधकाचे हे मेडल व त्यांच्या अन्य कांही वस्तू कुटुंबियांनी लिलावात विक्रीसाठी काढल्या आहेत. अन्य वस्तूंमध्ये त्यांचा प्रयोगशाळेत वापरण्याचा कोट, पुस्तके ,८६ हजार क्रोनरचा चेक व अन्य कांही वस्तू आहेत. नोबेल मेडल लिलावात विक्रीला येण्याची सत्तर वर्षातली ही पहिलीच वेळ आहे.

हेरिटेज ऑक्शन या कंपनीतर्फे या मेडलचा लिलाव केला जाणार असून त्याला २ लाख ५० हजार डॉलर्स मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.१० एप्रिलला न्यूयॉर्क मध्ये हा लिलाव होणार आहे. यातून मिळणारी रक्कम फ्रान्सिस यांच्या कुटुंबियांनी २०१५ साली त्यांच्याच नावाने सुरू करण्यात येणाऱ्या फ्रान्सिस क्रीक संस्थेला देणगी म्हणून दिली जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

अतिशय साधे आयुष्य जगलेल्या फ्रान्सिस यांनी त्यांना मिळालेली कोणतीच मेडल कधीच कार्यालयात मांडली नव्हती. साधा चॉकबोर्ड आणि डार्विनचे चित्र इतकीच त्यांच्या कार्यालयाची सजावट होती असे सांगून त्यांचे पुत्र संशोधक मायकेल म्हणाले की हे नोबेल मेडल एखाद्या संस्थेने अथवा संग्रहालयाने घ्यावे अशी आमची इच्छा आहे कारण त्यामुळे ते सर्वसामान्यांनाही पाहता येईल. ते म्हणाले की अमेरिकन संशोधक जेम्स वॅटसन यांच्याशी फ्रान्सिस यांची दाट मैत्री होती आणि दोघांनी एकत्र संशोधन करूनच डीएनए रेणूचा शोध लावला होता.