घरातून काम करण्यास याहूने केली बंदी

गुगलमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडून याहूच्या प्रमुख पदावर आरूढ झालेल्या पहिल्या महिला मरिसा मेअर यांनी याहूला पुर्नप्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी अनेक सुधारणा हाती घेतल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कंपनीने पूर्वी दिलेली घरातून काम करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे याहूच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कार्यालयात येऊनच आपले काम पूर्ण करावे लागणार आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या याहूला वर काढण्यासाठी मरिसा यांनी विविध मार्गांचा अवलंब करण्याचे धोरण सुरवातीपासूनच राबविले होते. कंपनीतच कामगारांना मोफत जेवण, नवीन स्मार्टफोन वाटप अशा अनेक योजना त्यांनी राबविल्या आणि त्याचे चांगले परिणामही कंपनीच्या प्रगतीवर होताना दिसत आहेत. कंपनीचा विकास अधिक वेगाने व्हावा आणि हातातील कामे अधिक तत्परतेने पूर्ण व्हावीत यासाठी कर्मचाऱ्याची आपसात इंटरॅक्शन असणे गरजेचे असते असा मरिसा यांचा विश्वास आहे. त्यातूनच घरातून काम करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला असल्याचे समजते.

घरातून काम आणि कार्यालयातून काम याविषयी पूर्वी केलेल्या सर्व्हेक्षणातून असे दिसून आले आहे की, उत्पादकता अधिक हवी असेल तर घरातून काम करणे फायद्याचे असते मात्र इनोव्हेशनमध्ये अधिक प्रगती हवी असेल तर कार्यालयात येऊन केलेले काम अधिक फायद्याचे ठरते असे प्रोफेसर जॉन सुलिव्हन यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले. इनोव्हेशनसाठी इंटरॅक्शनला पर्याय नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

या नव्या निर्णयाला याहूतीलच कांही कर्मचर्यांयनी विरोध केला आहे. विशेषतः घरात लहान मुले असतील अथवा वयोवृद्ध व्यक्ती असतील तर अशावेळी महिलांना घरातून काम करणे जास्त सोयीचे आहे असे त्यांचे म्हणणे आहे. स्वतः आई असलेल्या मरिसा यांनाही ही बाब मान्य आहेच पण अशा योजनांचा फायदा महिलांपेक्षा पुरूषच अधिक घेताना दिसतात असे त्यांचे त्यावरचे म्हणणे आहे.

Leave a Comment