‘लाइफ ऑफ पाई’चा ऑस्कर चौकार; ‘आर्गो’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

लॉस एंजेलिस: जगभरातल्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेला ८५ वा ऑस्कर सोहळा डॉल्बी थिएटरमध्ये दिमाखात पार पडला. अ‍ॅण्ड ऑस्कर गोज टू… म्हणंत सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोहचवणार्‍या या अवॉर्ड सोहळ्यात ’लाईफ ऑफ पाय’ सिनेमाने चार पुरस्कार आपल्या खात्यात जमा केले; तर बेन एफलेक दिग्दर्शित ’आर्गो’ हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला.

’लाईफ ऑफ पाय’ या सिनेमाला चार विभागात ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे. दिग्दर्शन, संगीत, चित्रिकरण आणि व्हिज्युअल इफेक्ट असे चार पुरस्कार ’लाईफ ऑफ पाय’ सिनेमाने आपल्या नावी केले आहेत.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार ’सिल्व्हर लाईनिंग प्लेबुक’ या सिनेमासाठी अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सला मिळाला; तर सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे डॅनियल डे लेविस! ’लिंकन’ या सिनेमातील भूमिकेसाठी डॅनियलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकाराचा पुरस्कार ख्रिस्टोफर वॉल्ट्झने जिंकला आहे. तर ’पेपरमॅन’ हा सिनेमा ऍनिमेटेड शॉर्ट फिल्म श्रेणीत सर्वोत्कृष्ट ठरला आहे. ’ला मिझरेबल’ सिनेमाला बेस्ट साऊंड मिक्सिंगचा पुरस्कार मिळाला आहे.

ऑस्कर-२०१३ चे सर्व मानकरी असे…
सर्वोत्कृष्ट चित्रपट – अर्गो, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – आंग ली – लाईफ ऑफ पाय, सर्वोत्कृष्ट अभिनेता – डॅनियल डे-लेविस – लिंकन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – जेनिफर लॉरेन्स – सिल्व्हर लायनिंग्ज प्लेबुक, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ख्रिस्तोफर वॉल्ट्झ – जँगो अनचेंज्ड, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – अ‍ॅन हॅथवे – ला मिझरेबल, सर्वोत्कृष्ट संगीतकार – मायकेल डॅना – लाईफ ऑफ पाय, सर्वोत्कृष्ट पार्श्‍वगायक – एडेल अ‍ॅडकिन्स आणि पॉल एपवर्थ – स्कायफॉल, सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट – आमर, सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड फिल्म – ब्रेव्ह, सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म – पेपरमॅन, सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म – कर्फ्यु, सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी – सर्चिंग फॉर शुगरमॅन, सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रण – झिरो डार्क थर्टी आणि स्कायफॉल, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – क्लॉडिओ मिराण्डा – लाईफ ऑफ पाय, सर्वोत्कृष्ट वेषभूषा- जॅकलीन ड्युरान – अ‍ॅना कॅरेनिना, सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन- लिंकन, सर्वोत्कृष्ट संकलन – विल्यम गोल्डनबर्ग – अर्गो, सर्वोत्कृष्ट रंगभूषा- लिसा वेस्टकोस्ट आणि ज्युली डार्टनेल – ला मिझरेबल, सर्वोत्कृष्ट ध्वनिमिश्रण – ला मिझरेबल, सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंटरी – इनकॉन्टे, सर्वोत्कृष्ट विज्युअल इफेक्टस – लाईफ ऑफ पाय, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले – क्वेंटिन टारांटिनो – जँगो अनचेंज्ड, सर्वोत्कृष्ट अ‍ॅडाप्टेड स्क्रीनप्ले – ख्रिस टेरिओ – अर्गो

ऑस्कर अ‍ॅवॉर्डची ट्रॉफी ३.५ इंच उंच आणि ८.५ पाऊंड वजनाची ऑस्कर ट्रॉफी असते. एक ट्रॉफी बनवण्याचा खर्च ५०० डॉलर इतका असतो. अशा ५० ट्रॉफीज बनवण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालवधी लागतो. ऑस्कर ट्रॉफी तयार करण्याची जबाबदारी शिकागोच्या आरएस ओवस अ‍ॅण्ड कंपनीकडे आहे. ट्रॉफीला मेट्रो गोडवायन मेयरच्या डायरेक्टर सेड्रिक गिब्सन यांनी डिझाइन केले आहे. या ट्रॉफीत एक व्यक्ती तलवार घेऊन चित्रपटाच्या रिलवर उभा आहे. चित्रपटाचे रिल अ‍ॅकडमीच्या पाच शाखा अर्थातच अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ आणि लेखकांचे प्रतीक आहे.

या सोहळ्यात पार्श्‍वगायनासाठी नामनिर्देशन मिळालेली आणि एकूणंच या सोहळ्यात एकमेव भारतीय नामनिर्देशित कलाकार असलेल्या बॉम्बे जयश्रीची मानाच्या पुरस्कारावर नाव कोरण्याची संधी हुकली आहे. जयश्रीने ‘लाईफ ऑफ पाय’ या चित्रपटासाठी गायलेले अंगाई गीत चर्चेचा विषय ठरले होते. मात्र जेम्स बॉण्डच्या ‘स्कायफॉल’ या चित्रपटातील ‘धिस इस द एण्ड’ या गाण्यासाठी, ब्रिटीश पार्श्‍वगायिका एडलने या पुरस्कारावर आपला हक्क गाजवला.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर हॉलिवूडच्या जुन्या वेषभूषेचा प्रभाव स्पष्टपणे दिसला. जेसिका चेस्टाईन ही अभिनेत्री सर्वात प्रथम थिएटरमध्ये हजर झाली. त्यावेळी तिने मर्लिन मन्रोची आठवण करुन देणारा पांढराशुभ्र गाऊन परिधान केला होता. मिस्टर प्रेसिडेन्ट या गाण्याच्यावेळी ज्या पद्धतीने मर्लिनने मेक अप केला तशाच आविर्भावात जेसिका अवतरली होती.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकलेल्या जेनिफर लॉरेन्सनेही पारंपरिक ऑत कुतूरची वेषभूषा केली होती. तिनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चार्लिझ थेरॉननेही पांढराशुभ्र डॉयर पद्धतीचा ड्रेस घातला होता. तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकलेल्या अ‍ॅन हॅथवेनी ‘माय फेअर लेडी’ फेम ऑड्री हेपबर्नची आठवण करुन दिली.

या पुरस्कार सोहळ्यामध्ये विश्वविख्यात संगीतकार आणि सतारवादक दिवंगत पंडीत रवीशंकर यांची कन्या नोरा जोन्स हिने आपला कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक असलेल्या सेठ मॅकफर्लेन याच्यासमवेत टेड चित्रपटासाठी लिहिलेल्या ‘एव्हरीबडी नीडस अ फ्रेन्ड’ या गाण्याची सादरीकरण ३३ वर्षीय नोराने केले. तिच्या या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसादही लाभला.

Leave a Comment