राज ठाकरे यांची अमित देशमुख आणि सतेज पाटलांबरोबर खलबते

लातूर: शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, लातूरचे आमदार अमित देशमुख आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्यात गुप्त बैठक झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसने या भेटीचा निषेध केला; तर अमित देशमुख हे आपले जुने मित्र असल्यामुळे ते भेटायला आल्याचे राज यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

सोलापूरात राज ठाकरेंनी अजित पवार, आर. आर. पाटील यांच्यावर डागलेली तोफ आणि त्यानंतर त्यांची अमित देशमुख आणि सतेज पाटलांनी घेतलेली गुप्त भेट यामुळे राष्ट्रवादीचे शहर, जिल्हाध्यक्ष मुर्तूजा खान यांनी निषेध व्यक्त केला.

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे काल लातूर दौर्‍यावर होते. ते सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. राज ठाकरे आपल्या सभेतून महाराष्ट्र सरकार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची टिंगल टवाळी करत आहेत; त्यांची निंदा करत आहेत; असे राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.