आईबापाकडून मुलीवर सावकाराशी शैय्यासोबतीची जबरदस्ती

ठाणे: कर्जफेड करू न शकल्याने पोटच्या किशोरवयीन मुलीला सावकाराशी शैय्यासोबत करण्याची जबरदस्ती करणार्‍या आई, बापाला पोलिसांनी अटक केली असून सावकार मात्र परागंदा झाला आहे.

ठाणे येथील एका दांपत्याने निसार खान या सावकाराकडून काही काळापूर्वी ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्याची वेळेवर परतफेड करता न आल्याने या आई बापाने चक्क आपल्या १६ वर्षीय मुलीला खानशी शैय्यासोबत करण्याची जबरदस्ती केली. खान तब्बल २ वर्ष या कोवळ्या मुलीचा उपभोग घेत होता.

खुद्द आई बापाच्या जबरदस्तीने होत असलेल्या या लैंगिक शोषणामुळे या मुलीची मानसिक स्थिती बिघडली असून ती घुमी आणि निराश बनल्याचे तिच्या शिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी खोदून खोदून चौकशी केली असता या मुलीने आपल्या शोषणाची कहाणी शिक्षकांना कथन केली. या शिक्षकांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलिसांकडे तक्रार दिली.

मात्र याचा सुगावा लागल्यानंतर या मुलीसह तिच्या आई, बापाने उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी पळ काढला. मात्र ठाणे पोलिसांनी या जोडप्यास अटक केली असून मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. सावकार खान याचा शोध पोलीस घेत आहेत.