लंडन – नोबेल पुरस्कार विजेते भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या स्पेक्ट्रोस्कोपी सिग्नलमध्ये सुधारणा करून त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातील उपचारांमध्ये प्रभावी वापर करण्यामध्ये शास्त्रज्ञांनी यश मिळवले आहे. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही त्यांचे संशोधन मोलाचे असल्याचे मानले जात आहे.
या शोधामुळे जैववैद्यकक्षेत्र आणि उपचार पद्धतींमध्ये एक मोठे दालन खुले झाले आहे. ब्रिटनमधील सेंट अँड्रयूज व जर्मनीमधील जेना या संस्थांमधील संशोधकांनी या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे. रामन यांच्या नेहमीच्या स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये ‘वेव्हलेंग्थ मॉडयुलेशन’ तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रियेच्या वेळी पेशींची सखोल माहिती मिळवता येत असल्याचे त्यांनी दाखवले आहे.
कोणत्याही नमुन्यापासून होणा-या प्रकाशाच्या अपस्करणाला रामन परिणाम म्हटले जाते. सी. व्ही. रामन यांनी हा शोध लावला होता. एखाद्या नमुन्यामध्ये असलेल्या मिश्रणाशी संबंधित मॉलिक्युलर फिंगरप्रिंट (नमुन्याच्या अंतरंगाचे छायाचित्र) मिळवणे या शोधामुळे शक्य झाले होते. त्यामुळे खनिजांची माहिती मिळवण्यापासून ते एका पेशीमध्ये असलेल्या प्रथिनांचे स्वरूप निश्चित करण्यापर्यंत उपयोग करता येऊ लागले. कर्करोगकारक पेशींचे निदानही या तंत्रज्ञानाद्वारे करता येऊ शकते.
या नव्या शोधामुळे एक मोठे क्रांतिकारक पाऊल पडल्याचे बायोमेडिकल स्पेक्ट्रोस्कोपी अँड इमेजिंग’च्या संपादकांनी सांगितले आहे.
अतिशय प्रकाशमान पार्श्वभूमीवर रामन यांच्या उपकरणातील संकेत कसे ग्रहण करायचे व यकृताच्या पेशींचा अभ्यास तसेच पॅरासेटामॉलच्या गोळीचा साध्या प्रकाशातील वर्णपट कसा मिळवायचा, याचे तंत्रज्ञान या संस्थांनी विकसित केले आहे.
प्रकाशाच्या विविध प्रकारानुसार रामन यांच्या उपकरणाद्वारे केल्या जाणार्या नोंदींमध्ये काही बदल होत असत. परंतु वेव्हलेंग्थ मॉडयुलेशन केल्यावर या उपकरणातून अपेक्षित परिणाम साध्य करता आला. रामन स्पेक्ट्रोस्कोपीमुळे विविध वैज्ञानिक क्षेत्रात अनेक आश्चर्यकारक सुधारणा घडून आल्या व पेशींच्या वर्गीकरणासाठी एक प्रभावी साधन उपलब्ध झाले.