भारतातील इंटरनेट सिस्टिमवर व्हायरसचा हल्ला

नवी दिल्ली: भारतीय इंटरनेटच्या नेटवर्कवर व्हायरसचा हल्ला झाला असून सर्च इंजिनवर हा व्हायरस युजरला भलतीकडेच घेऊन जातो. त्यामुळे इंटरनेटचा वेग कमी होणे आणि नको असलेली पाने आणि संशयास्पद वेबसाइट्स आपोआप उघडत असल्याचा इशारा केंद्रीय सायबर सुरक्षा संस्थेने दिला आहे.

देशातील इंटरनेट नेटवर्कच्या सुरक्षेची खबरदारी घेणारी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-ईन) या संस्थेने नेटिझन्सना सावधगिरीचा इशारा दिला आहे. बामिताल या ट्रोजन व्हायरसने भारतीय सायबर विश्वात घुसखोरी केली असल्याचे सीईआरटीच्या पत्रकात म्हटले आहे. ट्रोजन बामिताल व्हायरस घुसखोरीबद्दल सीईआरटीने विशेष खबरदारीची सूचना जारी केली आहे. बामिताल झपाट्याने हातपाय पसरतोय.

सर्च इंजिनवर आपण रिक्वेस्ट टाकताच तो सर्च रिझल्टमध्ये बदल करून जाहिरातीच्या लिंक्सवर अथवा भलतीकडेच वळवतो असे सीईआरटीच्या पत्रकात म्हटले आहे. या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी विश्वासार्ह अँटिव्हायरस आपल्या संगणकात ठेवा असा सल्लाही देण्यात आला आहे.

या व्हायरसमुळे वेब ब्राउजरची गती मंदावते. संगणकाला मालवेअरचीही लागण होते. भलत्याच वेबसाइट युजरला दिसतात. वेब ब्राऊजवरील ट्रॅफिकमध्ये हस्तक्षेप होतो. होस्ट फाइल बदलल्या जातात आणि सुरक्षाविषयक वेबसाइट्सपर्यंत पोहोचता येत नाही.

Leave a Comment