मुंबई: हैदराबादमध्ये नुकत्याच झालेल्या स्फोटाच्या पाश्वभूमीवर पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या स्फोटांचा संबंध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे स्फोटातील संशयित अतिरेक्यांपैकी तबरेज आणि वकार उर्फ अहमद या दोघांचा हैदराबाद स्फोटात हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या दोघांना हैदराबादमध्ये पाहिल्याचे तब्बल ३०० दूरध्वनी महाराष्ट्र एटीएसला आले. मात्र या माहितीवर अद्याप काहीच कारवाई का झाली नाही हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. त्यामुळे महाराष्ट्र एटीएस कुठेतरी कमी पडत असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र एटीएने ११ फेब्रुवारी रोजी या संशयित अतिरेक्यांची रेखाचित्रे जारी केली होती. तसेच माहिती देणर्यास दहा लाखांचे इनामही जारी करण्यात आले होते. तरबेजला हैदराबादमध्ये पाहिल्याचे सांगणारे अनेक कॉल येऊनही महाराष्ट्र एटीएसने आंध्र पोलिसांनाही ही माहिती दिली नाही. एवढेच नाही तर वेगवेगळ्या राज्यांच्या तपास यंत्रणांमधील समन्वयाचा अभावही पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे.
महाराष्ट्र एटीएसने वेळीच योग्य कारवाई केली असती तर हैदराबादमधील स्फोट टाळता आले असते का; असा सवालही विचारला जाऊ लागला आहे.