हैदराबाद स्फोटाची पाळेमुळे पाकिस्तानात

हैदराबाद: आंध्रप्रदेशची राजधानी हैदराबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट पाकिस्तानात शिजला आणि या कटात अनेक भारतीय आणि पाकिस्तानी दहशतवादी गटांचा सहभाग असल्याची माहिती पुढे येत आहे. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरू यांना फाशी दिल्याचा सूड म्हणून हे स्फोट करण्यात आले.

गुरूला फाशी दिल्यानंतर युनायटेड जिहाद कौन्सिलच्या पुढाकाराने हुजी, हिजबुल मुजाहिदीन, लष्कर ए तैय्यबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांची बैठक पाकिस्तानात पार पडली. या बैठकीत दोघा दहशतवाद्यांच्या फाशीचा बदला घेण्यासाठी हैदराबाद येथे स्फोट घडविण्याचा कट रचण्यात आला; अशी माहिती पुढे आली आहे.

भारतीय गुप्तचर यंत्रणांना या हालचालींचा सुगावा लागला होता. त्यानुसार दि. १६, १९ आणि २० फेब्रुवारी रोजी सर्व राज्यांना सूचना देण्यात आल्या.

दिलसुखनगर बसस्टँडच्या भागात संध्याकाळी ७ वाजून १ मिनिटांनी साखळी बॉम्बस्फोट झाले आहे. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी हे स्फोट झाले आहे. या स्फोटात १५ जण ठार झाल्याची माहिती हाती आली आहे. तर ११९ जण जखमी झाले आहेत.

पहिला स्फोट हा संध्याकाळी ७ वाजून १ मिनिटांनी झाला. ऐन संध्याकाळी गर्दीच्या ठिकाणी हे बॉम्बस्फोट घडवून आणले आहे. कोणार्क आणि व्यंकटगिरी या सिनेमागृहाजवळ आणि दिलसुखनगर बसस्टँडजवळ हे स्फोट झाले असून स्फोटाचे कारण अजून समजू शकले नाही. घटनास्थळी पोलीस दलाने धाव घेतली असून संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. मदतकार्य पोहचले आहे. जखमींना नजीक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हे साखळी बॉम्बस्फोट म्हणजे अफजल गुरु याला फाशी दिल्याबद्दल दहशतवादी गटांनी सूड उगविण्यासाठी केलेले कृत्य असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशाच्या महानगरात अशा प्रकारचा दहशतवादी प्रकार होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी नुकतीच वर्तविली होती. त्याबद्दल विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना माहितीही देण्यात आली होती; असा दावा गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. मात्र गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यात समन्वय नसल्याने हा प्रकार टाळता आला नसल्याची टीकाही होत आहे.

या स्फोटामुळे दिल्ली, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशात हाय ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. सन २००२ मध्ये याच भागात शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले होते.

Leave a Comment