सुशीलकुमार शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या शिबिरात दहशतवादी प्रशिक्षण दिले जाते हे आपले विधान मागे घेतले आहे. आपण ते विधान अनवधानाने केले होते. ते केल्याबद्दल आपल्याला खेद होतो, कोणाच्याही भावना दुखवण्याचा आपला हेतू नव्हता. तसे झाले असल्यास आपण दिलगीर आहोत असे त्यांनी म्हटले आहे. असो. या प्रकारात शिंदे यांची मोठीच बदनामी झाली. काल ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून भारतात आले होते. त्यांनी अमृतसरला भेट दिली आणि तिथल्या जालीयनवाला बाग हत्याकांडातल्या शहिदांच्या स्मारकाला पुष्पचक्र वाहिले.
ही उपरती खरी आहे का ?
१९१९ साली या ठिकाणी ब्रिटीशांनी केलेल्या भीषण गोळीबारात ४०० पेक्षाही अधिक भारतीय लोक मारले गेले होते. या घटनेला आता ९५ वर्षे उलटली आहेत. पण आता या ठिकाणाला भेट देऊन ब्रिटनच्या पंतप्रधानांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि या हत्याकांडाबद्दल भारतीयांची माफी मागितली. गंमतीचा भाग असा आहे की ९५ वर्षे ब्रिटीशांना या घटनेची आठवणही झाली नाही, ती आताच का झाली ? सोनिया गांधी यांनी १९९८ साली असाच एक माफीनामा दिला होता. १९८४ साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत झालेल्या हत्याकांडात काँग्रेसच्या गुंडांनी ३ हजार शीखांना केवळ दोन दिवसांत जाळून मारले होते. या घटनेनंतर सोनिया गांधी यांनी १५ वर्षांनी हा माफीनामा दिला.
अर्थात यामागे पश्चात्तापाची भावना नक्की होती की नाही असा प्रश्न पडतो. या १५ वर्षांत काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आले होते की, या हत्याकांडामुळे शीख समुदाय काँग्रेसपासून मोठ्या प्रमाणावर दुरावला आहे. त्याला जवळ आणायचे असेल तर आपल्याला अशी माफी मागायला हवी हे सोनिया गांधी यांच्या लक्षात आले होते. म्हणजे या माफीनाम्यामागे राजकीय कारण आणि मतांचा हिशेब होता. कारण काहीही असो पण सोनिया गांधी यांनी घटनेनंतर १५ वर्षांनी तरी माफी मागितली पण ब्रिटीशांना तर ही माफी मागायला तब्बल ९५ वर्षे लागली. यामागेही तिथल्या आता होणार असलेल्या निवडणुका आणि तिथले भारतीयांचे निर्णायक ठरू पाहणारे मतदान हे कारण आहे हे विसरता येत नाही.
कॅमेरून यांची माफी मागितली याचा सुशीलकुमार शिंदे यांच्यावर प्रभाव पडला की काय हे माहीत नाही पण त्यांनीही कॅमेरून यांच्या पाठोपाठ हिदुत्ववादी संघटनांची माफी मागितली. या माफीला आणखी एक कारण होते. कालच त्यांच्या निवासस्थानावर भाजपाचा मोठा मोर्चा येणार होता. त्याच्या आत ते दिलगिरी व्यक्त करून मोकळे झाले. आता या दिलगिरीत निरुपाय आहे की, खराच पश्चात्ताप आहे हे एक संशोधनाचा विषय ठरणार आहे.
भारतीय जनता पार्टी हा देशातला मोठा आणि मुख्य विरोधी पक्ष आहे. त्याच्यावर असा आरोप केल्याने आपल्याला एवढा विरोध होईल याची कल्पना शिंदे यांना आली नसावी. म्हणून त्यांनी भाजपावर हा आरोप केला आणि भाजपाचे नेते चवताळल्यावर शिंदे यांना वस्तुस्थितीची जाणीव झाली. म्हणून त्यांच्यावर दिलगिरी व्यक्त करण्याची पाळी आली. शिंदे यांच्यावर ही पाळी यावी ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. कारण ते आपल्या गोडबोल्या स्वभावामुळे लोकप्रिय झाले आहेत. मागासवर्गीय समाजात जन्माला येऊनही आपले वाचन आणि उत्तम संवाद कौशल्याच्या जोरावर ते आता गृहमंत्रीपदापर्यंत वर गेले आहेत. ते एखाद्याही सभेत कधी कोणावर तुटून पडत नाहीत. कोणालाही शिविगाळ करीत नाहीत. खाजगी संभाषणातही ते कोणाला टोचून बोलत नाहीत. सर्वांशी नम्रपणे बोलतात. त्यांचे संवाद कौशल्य हेच त्यांचे भांडवल आहे. पण आता त्यांच्या जीवनातली राजकारणाची चढती भांजणी संपून उतरती भांजणी सुरू झाली आहे. तिलाही हे संभाषण कौशल्यच कारणीभूत ठरायला लागले आहे. फरक इतकाच की, चढत्या भांजणीला त्यांचे चांगले संभाषण कौशल्य उपयुक्त ठरले होते तर उतरत्या भांजणीला त्यांचे विपरीत कौशल्य कारणीभूत ठरायला लागले आहे. दोन्ही प्रकारचा प्रभाव संभाषण कौशल्यामुळेच आहे.
त्यांनी गृहमंत्रीपद स्वीकारल्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यसभेत जया बच्चन यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. तो प्रकार त्यांच्या अंगलट आला. नंतर ते कोळसा घोटाळ्यावर काही तरी टिप्पणी करून बसले. त्यावेळी त्यांना तीच गोष्ट वेगळ्या शब्दात सांगता आली असती. बोफोर्स प्रकरणाची बरीच चर्चा झाली पण शेवटी त्यात काही तथ्य नाही असे सर्वांच्याच लक्षात आले तसाच प्रकार कोळसा घोटाळ्यात होईल आणि त्यात काही तथ्य नाही हे लोकांच्या लक्षात येईल, असे त्यांना म्हणायचे होते आणि तसेच त्यांनी म्हणायला हवे होते. ती वस्तुस्थितीही आहे. पण तसे न म्हणता त्यांनी, लोक बोफोर्स प्रकरण विसरले तसेच कोळसा प्रकरणही विसरून जातील असे ते म्हणाले. त्यात लोकांची खिल्ली झाली. त्याचा अर्थही आपल्या पक्षाने ही प्रकरणे केली आहेत पण लोक विसरतील असा निघाला. त्यातून ते अडचणीत आले. आता भाजपावरच्या या आरोपानेही त्यांचीच कडी झाली. लोकशाहीत सत्तारूढ नेत्यांना काहीही बोलण्याची मुभा नसते. मोठ्या पदावर बसणारांनी जबाबदारीने बोलायला पाहिजे.