सायबर हल्ल्यात चीन सरकारचा हात असल्याचा आरोप

वॉशिंग्टनः अमेरिकी संस्था, कंपन्यावर होत असलेल्या सायबर हल्ल्यात चीनी सरकारचा हात असल्याचा आरोप मँडीअ‍ॅट या अमेरिकन सायबर सुरक्षा कंपनीने केला आहे. मात्र चीनने त्वरीत हे आरोप फेटाळून लावले असून हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.

गेली दोन वर्षे सातत्याने अमेरिकेतील कंपन्या आणि संस्थांवर सायबर हल्ले होत आहेत. लष्करी संस्थांपासून अगदी टेलिकम्युनिकेशनपर्यंच्या सर्व क्षेत्रातील कंपन्यांवर हे हल्ले होत आहेत. मँडीअ‍ॅट संस्थेने या संदर्भात प्रसिद्धकेलेल्या ६० पानी अहवालात हे हल्ले शांघाय येथील हॅकर्स संघटनेकडून केले जात असून चीन सरकारच या हल्लेखोरांना प्रायोजित करत असल्याचे म्हटले आहे.

एपीटी १ असे या संघटनेचे नामकरण मँडीअ‍ॅटने केले असून या संघटनेच्या कामाची पद्धत पिपल्स लिबरेशन आर्मी युनिट ६१३९८ प्रमाणेच असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. या संस्थेचे मुख्यालय शांघायच्या पुडींग जिल्ह्यात आहे.

मँडीअ‍ॅटने असाही दावा केला आहे की सायबर हल्ले झालेल्या क्षेत्रांपैकी २० क्षेत्रातील हल्ल्यांचे धागेदोरे मिळाले आहेत. यात लष्कराच्या ठेकेदारांपासून रासायनिक क्षेत्रे, टेलिकम्युनिकेशन कंपन्यांचा समावेश आहे.

चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे आणि आमच्याविरूद्धचा खोटा प्रचार हा अमेरिकेच्या समस्येवरचा उपाय नाही असे म्हटले आहे. चीनमध्ये हॅकींगला कायदेशीर बंदी आहे आणि हॅकींग करणार्‍यांविरोधात चीन सरकार नेहमीच कडक कारवाई करते असेही ते म्हणाले.

Leave a Comment