नवी दिल्ली दि.२१- यंदा २८ फेब्रुवारीला सादर होत असलेल्या रेल्वे अर्थंसकल्पात नवीन १०० गाड्यांची घोषणा केली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या नव्या गाड्यात डबलडेकर एसी गाड्यांचाही समावेश आहे. प्रवाशांच्या मागण्या आणि हित लक्षात घेऊन विविध प्रवासी सेवांचा विस्तार तसेच विविध राज्यांच्या मागण्यांनुसार सध्या सुरू असलेल्या गाड्यांचा मार्ग वाढविण्याचा प्रयत्नही या अर्थसंकल्पात केला गेला असल्याचे समजते.
नवीन वर्षात रेल्वेसाठी नवीन ४२०० कोच तसेच १६००० वॅगन आणि नवीन इंजिन्सही उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे ईशान्येकडील राज्यांत रेल्वे सेवेचा विस्तार केला जाणार आहे. कांही लोकप्रिय जलद गाड्यांची फ्रिक्वेन्सी वाढविली जाणार आहे असेही समजते. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आपल्या भाषणात या विषयीच्या घोषणा करतील असेही समजते.
नवीन कोचमध्ये अंध व्यक्तींना उपयुक्त होतील असे ब्रेल स्टीकर्स बसविण्यात येणार आहेत तसेच पँट्री आणि एसी कोच येथे आग लागण्याचा असणारा धोका लक्षात घेऊन आग प्रतिबंधक यंत्रणाही कार्यान्वित करण्यात येणार आहे. सध्या रेल्वेला आर्थिक तंगी जाणवत आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून ३८ हजार कोटी रूपयांची मागणीही करण्यात आली आहे मात्र २८ हजार कोटी रूपये रेल्वेला दिले जातील असा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.