देशाच्या संरक्षण सिद्धतेचे प्रदर्शन

पोखरण – देशावर शेजारी राष्ट्रांकडून हल्ले होण्याची दाट शक्यता, नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ले यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही असुरक्षिततेची जाणीव होत आहे. मात्र देशाची संरक्षण सिद्धता किती उत्तम प्रकारची आहे आणि कोणत्याही हल्ल्याचा तसेच आपत्तीचा मुकाबला आपण किती समर्थपणे करू शकतो याची प्रात्यक्षिके पोखरण येथे २२ फेब्रुवारी रोजी होत असून त्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या नॅशनल वाहिनीवरून केले जाणार आहे. दुपारी चार ते रात्री आठ पर्यंत सादर होणारा हा कार्यक्रम -‘ मस्ट सी‘; किंवा ‘चुकवू नये’ अशा श्रेणीतील आहे.

या प्रात्यक्षिकांची रंगीत तालिम पाहण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्यातून आपली संरक्षण दले किती सिद्ध आणि जिगरबाज आहेत याची प्रचीती आली. भारतीय वायूदलातर्फे ही प्रात्यक्षिके होत असून राष्ट्रपती प्रवण मुखर्जी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

देशाचा, वायूदलाचा आणि दक्षिण मुख्यालयाचा ध्वज घेऊन जाणारी हेलिकॉप्टर्स, त्या पाठोपाठ पाच मिग २१ विमाने, जग्वार आणि तीन सुखोई विमानांचा फ्लायपास नजरेसमोरून जाईपर्यंत पाठोपाठ वायूवेगाने जाणार्‍या विविध विमानांनी केलेल्या चित्तथरारक कसरती, स्वेदशी बनावटीचे तेजस हे छोटेसे पण अतिउपयुक्त लढाऊ विमान आणि त्याने दाखविलेली युद्धकौशल्ये, सुखोईची थरारक उड्डाणे, मिग २९ चा सुपरसॉनिक आवाज , सर्वच लढाऊ विमानांनी क्षणात वेध घेऊन लक्ष्यावर केलेले अचूक बॉम्बफेक प्रेक्षकांना थक्क करून गेली. मानवरहित, आवाज न करणारे आणि सहजी दिसू न शकणारे नवीन प्रकारचे विमानही या प्रात्यक्षिकात सामील झाले होते. तसेच अजस्त्र ट्रान्स्पोर्ट विमान किती सहजपणे मदत पोहोचवित असते याचाही प्रत्यय आला.

हे अजस्त्र विमान छोट्या धावपट्टीवर उतरविणे आणि त्याच छोट्या धावपट्टीवरून पुन्हा हवेत झेप घेणे खरे कौशल्याचे काम. मात्र आपल्या वैमानिकांनी हे अतिशय कुशलपणे करून दाखविले.

पूर, भूकंप, अपहरणांची प्रकरणे यात सातत्याने उत्तम कामगिरी करत असलेल्या हेलिकॉप्टरच्या तुकडीने हवेतूनच पाण्याचा प्रचंड फवारा करून विझविलेले आगीचे लोळ, आपत्तीच्या भागात उतरविलेले सैनिक, सर्च लाईटच्या सहाय्याने केलेले बचाव कार्य, इमारतीच्या छतावर उतरविलेले जिगरबाज एनएससीचे कमांडो आणि त्यांनी अचूक आणि जलद हालचाली करून ताब्यात घेतलेली इमारत आपल्या २६/११ च्या हल्ल्यावेळी नरीमन पॉईटवरील छबाड हाऊस इमारतीत उतरलेल्या कमांडोंची पुन्हा आठवण करून देणारी ठरली. दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही अचूक लक्ष्यवेध करणारी वायूदलाची ताकद यामुळे समजून आली.

कित्येक किलोमीटरवर असलेल्या लक्ष्याचा वेध घेणारी मिसाईल्स प्रंचड आवाज आणि आगीचा लोळ सोडत हवेत झेपावली तेव्हा प्रेक्षकांनी जीव मुठीत धरून ठेवला होता. गेले दोन अडीच महिने पोखरणच्या ओसाड वाळवंटात, तंबूत राहून आणि अनेक अडचणींचा सामना करत आपले लष्कराचे जवान आणि अधिकारी त्यांच्या मदतनीसासह अव्याहत या प्रात्यक्षिकांची तयारी करत आहेत. तेव्हा हे प्रक्षेपण पाहायला विसरू नका.

Leave a Comment