सावध ऐका पुढच्या हाका

सुशीलकुमार शिंदे हिंदुत्ववादी संघटनांना अतिरेकी  ठरवत आहेत. पाकिस्तानातल्या धोकादायक मुस्लिम दहशतवाद्यांचा उल्लेख आदराने करीत आहेत. त्यांनी आणि  दिग्विजयसिंग यांनी ओसामा आणि हाफीझ सईद यांना हीज हायनेस म्हणायचे तेवढे बाकी ठेवले आहे. हे सारे का चालले आहे हे सर्वांनाच माहीत आहे. असे केल्याने हिंदू आणि मुस्लीम यांच्यातली फूट वाढेल आणि आपल्याला  मुस्लिम मतांचा लाभ होईल असा त्यांचा डाव आहे हे कळायला काही मोठ्या जाणकाराची गरज नाही. त्यांना असा डाव टाकावासा वाटावा असे वातावरणही आहे. संघाला शिव्या दिल्या की मुस्लिम मतदार खुष होतात. विशेषतः आपल्या मतांच्या भीकेसाठी एक हिंदू नेताच हिंदुत्ववादी संघटनेला शिव्या देतोय यासारखे समाधान दुसर्याश कशात मिळणार आहे.

आपल्या समाजातली शिक्षणाची, बेकारीची  स्थिती कितीही वाईट असली तरी त्यांना त्याची खंत नाही. पण संघावर टीका केलेली त्यांना चालते आणि आवडतेही. म्हणूनच पी. चिदंबरम आणि सुशीलकुमार शिदे यांना संघाला अतिरेकी जाहीर करण्याचा मोह होतो. त्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार होतात. शेवटी वाईट कारभार करूनही त्यांना अशा भावनात्मक मुद्यांवरूनच मते मिळत असतात. शेवटी हे राजकारण आहे. मुस्लिम मतदारांची मनस्थिती अशी असली तरीही त्यांच्यात निदान काही लोकांनी तरी वेगळा विचार करायला सुरूवात केली आहे. काँग्रेस नेत्यांच्या अशा स्वार्थी विधानांबद्दल त्यांना मते देऊन आणि त्यांना संधी देऊन  बहुसंख्य हिंदू आणि आपल्यातले अंतर वाढवू नये, ते आपल्या हिताचे नाही हे त्यांना कळायला लागले आहे.  

म्हणूनच गुजरातेतल्या एका मुस्लिम संघटनेने मोदी यांना पंतप्रधान करावे अशी मागणी केली आहे. मोदी यांची मुस्लिम विरोधी प्रतिमा तयार करण्यात आली आहे. ती अधिक गडद होऊन मुस्लिमांनी आपल्या मागे यावे यासाठी मोदींचे सारे विरोधक त्यांच्या मागे लागले आहेत. २००२ सालच्या दंगलींची हे लोक वारंवार आठवण करून देत आहेत. ती वारंवार करून दिल्या की मुस्लिमांच्या भावना भडकतात हे या लोकांना माहीत आहे. पण आता लोकांच्या हे लक्षात आले आहे की, गुजरातेत २००२ साली दंगली झाल्या असल्या तरीही त्यानंतर मोदी मुख्यमंत्री झाले आणि गेल्या अकरा वर्षात एकही जातीय दंगल झाली नाही. अन्य कोणत्याही राज्यात अशी शांतता दिसत नाही. ती गुजरातेत आहे आणि तिच्यामुळेच गुजरातचा विकास वेगाने होत आहे. हा फरक मुस्लिम मतदारांच्या लक्षात येतो. त्यामुळे असे मोदीवादी वातावरण तयार होते.

अर्थात असे काही फुटकळ पाठींबे मिळाल्याने आता सारा मुस्लिम समाज आपल्या मागे येणार असे स्वप्न भाजपाच्या नेत्यांना वाटायला लागले तर तो भोळसट आशावाद ठरेल हेही तितकेच खरे. कारण शेवटी असा पाठिंबा हा काही वेळा धोरणात्मकही असू शकतो. बिहारमध्ये तसे स्पष्टपणे दिसून आले आहे. ज्या मतदारसंघात मुस्लिमांचा पाठींबा मिळाल्या खेरीज कोणी निवडूनच येऊ शकत नाही त्या मतदारसंघात भाजपाचे नेते निवडून आले आहेत. असाच आणखी एक प्रकार आता गुजरातेत नगर पालिकांच्या निवडणुकीत घडला आहे. तिथे ७५ नगर पालिकांच्या निवडणूका झाल्या. त्यातल्या ४७ नगर पालिकांत भाजपाला  स्पष्ट बहुमत मिळाले.

गुजरातेत शहरांत मुस्लिमांची संख्या मोठी आहे तरीही या शहरांत भाजपाची सरशी झाली आहे. हे कशाचे चिन्ह आहे ? मोदी यांची प्रतिमा मुस्लिम विरोधी असल्याने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला नितीश कुमार यांचा विरोध आहे पण मोदींची ही प्रतिमा झपाट्याने बदलत आहे. हा समाज त्यांच्या मागे उभा राहण्याच्या मनस्थितीत आहे. भारताचे निवडणुकीचे राजकारण वेगळ्या अंगाने बदलत आहे.

गुजरातच्या सौराष्ट्र विभागात द्वारका जिल्हयातल्या  सालाया या नगर पालिकेत तर कमालच झाली. या गावात ९० टक्के वस्ती मुस्लिम समाजाची आहे. अशा गावात भाजपाचा एखादा नगरसेवक औषधाला जरी निवडून आला तरीही भाजपाचे नेते स्वतःची पाठ थोपटून घेतील अशी ही मुस्लिम बहुसंख्या आहे. आजवर या नगरपालिकेत काँग्रेसने सतत विजय मिळवला होता पण आता यथे सर्व २७ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. यावेळी झालेल्या निवडणुकीत  भाजपाने आधीच चार जागा बिनविरोध जिंकल्या होत्या. २३ जागांवर निवडणूक झाली. त्याही सगळ्या जागा भाजपाने जिंकल्या. काँग्रेसचे सारे उमेदवार पडले. त्यातल्या तिघांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही. भाजपाच्या  २७ सदस्यांत २४ मुस्लिम असून तिघे अनुसूचित जातींचे आहेत. आता तरी मुस्लिम मतदार भाजपाकडे कलत नाहीत असे कोणी म्हणणार नाही. गुजरातेत गतवर्षी झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत तर अनेक मुस्लिमांनी भाजपाला मदत केली होती. भाजपाला तेव्हा ८० टक्के मतदान झाले होते.  भारताच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला कधीही एवढे मतदान झालेले नाही. पंडित नेहरूंनाही ही किमया साध्य झाली नव्हती.