भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी सुरू व्हायला अवघा एक दिवस बाकी असताना वीरेंद्र सेहवागच्या जोडीला सलामीला कोणाची निवड करायचा असा प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनाला पडला आहे. सेहवाग सोबत ओपनिंगला शिखर धवन येणार की मुरली विजय याची चिंता भारतीय संघ व्यवस्थापनाला सतावत आहे.
भारतीय संघाचे तीन दिवसांचे सराव शिबिर बंगलोरमध्ये झाले. त्यानंतर चेन्नईत आलेल्या भारतीय संघाने चेपॉक मैदानावर बुधवारी सराव केला. सलामीला सेहवागच्या साथीसाठी निवडलेल्या मुरली विजय आणि शिखर धवन या दोघांनीही प्रदीर्घ काळ सराव केला. सर्वप्रथम नेटस्मध्ये विजयने फलंदाजीचा सराव केला. त्यानंतर सरावासाठी आलेल्या गोलंदाजांकडून त्याने थ्रो-डाऊन्स करुन घेतले. त्यामुळे वीरूच्या साथीला स्थानिक फलंदाज मुरलीची निवड करावी की धवनला पसंती द्यावी; याबाबत संघ व्यवस्थापनाने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट झाले. गोलंदाजांमध्ये वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने बराच घाम गाळला. चार फिरकीपटूंपैकी रवींद्र जडेजाने सर्वात जास्त सराव केला. त्या पाठोपाठ आर. अश्विन व प्रग्यान ओझा यांनीही सराव केला.
दुसरीकडे कांगारुंनी एक दिवस आधीच अंतिम चमू जाहीर करुन यजमानांवर बाजी मारली आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये पीटर सिडल व मिशेल स्टार्क यांच्या जोडीला उंचापुर्या जेम्स पॅटिन्सनने पुनरागमन केले आहे. मात्र पाहुण्यांनी लॉयन या एकमेव फिरकीपटूची निवड केल्याने फिरकीचा उर्वरित भार कर्णधार मायकेल क्लार्क व डेव्हिड वॉर्नर हे उचलणार असल्याचे स्पष्ट झाले. पोर्तुगीज मूळ असलेल्या अष्टपैलू मोईझेस हेन्रिकेसला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियाचा अंतिम चमू : मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवन, डेव्हिड वॉर्नर, फिल ह्युजेस, शेन वॉटसन, मोईझेस हेन्रिकेस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), नॅथन लॉयन, जेम्स पॅटिन्सन, पीटर सिडल, मिशेल स्टार्क