संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरणार वादळी

नवी दिल्ली: सुमारे तीन महिने चालणार्‍या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून प्रारंभ होणार आहे. हेलिकॉप्टर घोटाळा, भ्रष्टाचार, महागाई आणि इतर मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, हिंदू दहशतवादाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल आज केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे या मुद्द्यावरून निर्माण होणारा पेच टळला आहे.
संसदेत विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारची कोंडी करण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (व्हीव्हीआयपी) वापरासाठी खरेदी करावयाच्या हेलिकॉप्टर्स व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप पुढे आला आहे. या घोटाळ्यावरून राजकारण तापले असतानाच संसद अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे हा मुद्दा अधिवेशन काळात गाजणार आहे. भ्रष्टाचार, महागाई, महिलांची सुरक्षा, पाकिस्तानी सैनिकांनी दोन भारतीय जवानांची केलेली निर्घृण हत्या, स्वतंत्र तेलंगण राज्याची मागणी, महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती या मुद्द्यांवरून संसद दणाणून सोडण्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत.

दरम्यान, या अधिवेशनात मांडण्यात येणार्‍या सर्वसाधारण अर्थसंकल्पाबाबत आणि रेल्वे अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता आहे. रेल्वे अर्थसंकल्प २६ फेब्रुवारीला तर सर्वसाधारण अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे.