
नवी दिल्ली: भगव्या दहशतवादाबाबत केलेल्या विधानासाठी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीने भारतीय जनता पक्षाचे समाधान झाले असले तरीही भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र त्यावर समाधानी नाही.
नवी दिल्ली: भगव्या दहशतवादाबाबत केलेल्या विधानासाठी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीने भारतीय जनता पक्षाचे समाधान झाले असले तरीही भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र त्यावर समाधानी नाही.
शिंदे यांचे जयपूर येथील वक्तव्य अतिशय घृणास्पद आणि धक्कादायक होते. त्यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीने आमचे समाधान झालेले नाही; असे संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी स्पष्ट केले. भाजप मात्र शिंदेच्या दिलगिरीवर समाधानी आहे. शिंदे यांच्या दिलगिरीचे आम्ही स्वागत करतो. संसदेच्या कामकाजात कोणताही अडथळा आणण्याची आमची इच्छा नाही; असे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवादाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असतानाच भाजपने शिंदेंबाबत आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारला. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त करताना आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचे म्हटले आहे. त्यांच्या दिलगिरीमुळे संसदेचे कामकाज सुरळीत चालण्याची शक्यता बळावली आहे.
मागील महिन्यात जयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात शिंदे यांनी हिंदू दहशतवादाबाबत वक्तव्य केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडून दहशतवादाचे प्रशिक्षण देणारी शिबिरे चालवली जातात, असा आरोप त्यावेळी शिंदे यांनी केला होता. या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या भाजपने शिंदे यांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली होती. उद्यापासून सुरू होणार्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिंदे यांच्याबाबत आणखीच आक्रमक पवित्रा स्वीकारला. शिंदे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज भाजपने संसद मार्गावर जोरदार निदर्शने केली. सर्वपक्षीय बैठकीतही या पक्षाने शिंदे यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतली. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या आजच झालेल्या बैठकीतही शिंदे यांच्या वक्तव्याचा मुद्दा अधिवेशन काळात लावून धरण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे शिंदे यांच्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ होणार असल्याचे स्पष्ट झाले. शिंदे यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर अधिवेशन काळात बहिष्कार टाकण्याचा इशाराही भाजपने दिला होता. या पार्श्वभूमीवर लोकसभेचे नेतेही असणार्या शिंदे यांनी निवेदन प्रसिद्धीस देऊन वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. माझ्या वक्तव्यातून गैरसमज निर्माण झाला. विशिष्ट धर्माचा संबंध मी दहशतवादाशी जोडल्याचा आणि विशिष्ट राजकीय संघटनांवर आरोप केल्याचा अर्थ त्यातून काढला गेला.
दहशतवादाचा संबंध कुठल्याही धर्माशी जोडण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या भाषणात उल्लेख झालेल्या संघटनांशी दहशतवादाचा संबंध जोडता येऊ शकतो असे म्हणण्याला कुठलाही आधार नाही. माझ्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्याने मी हे स्पष्टीकरण देत आहे. तसेच, माझ्या वक्तव्यामुळे भावना दुखावलेल्यांकडे मी दिलगिरी व्यक्त करतो, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिंदे यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीचे भाजपने स्वागत केले आहे. अर्थात, शिंदे यांनी ही कृती आधीच केली असती तर पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांना खूष होण्याची संधी मिळाली नसती, अशी खिल्लीही या पक्षाने उडवली.