भाजपासाठी नरेंद्र मोदी; असून अडचण…

नवी दिल्ली: आगामी सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे नाव पुढे केले तर भारतीय जनता पक्षाच्या काही जागा वाढतील; मात्र मित्रपक्षांच्या विरोधामुळे सरकार स्थापन करणे कठीण होऊन जाईल; असा निष्कर्ष भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काढला आहे.

२०१४ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीबद्दल जास्तच आकर्षण आहे. त्यातच भाजपमधील नेते त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्यात व्यस्त आहेत. अनेकांनी आपल्या मर्जीतील उमेदवाराला प्राधान्य दिले आहे. मात्र याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार येत्या लोकसभा निवडणुकीत जर भाजपने नरेंद्र मोदींना प्रोजेक्ट केले तर पक्ष १८० जागा जिंकू शकतो. भाजपने जर मोदींना पुढे केले नाही तर पक्षाला किमान ३० जागांवर नुकसान होऊ शकते. मात्र असे असले तरी संघ आणि भाजपा नेत्यात यावरही मंथन झाले आहे की; जरी मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपने १८० जागा जिंकल्या तरी सरकार स्थापनेसाठी व बहुमतासाठी २७२ चा आकडा गाठणे अवघड आहे. भाजपने मोदींच्या नेतृत्त्वाशिवाय जरी १५० जागा जिंकल्या तरी सहयोगी पक्षाच्या मदतीमुळे भाजप सरकार स्थापन करु शकते; यावरही चर्चा झडली आहे.

संघाच्या या अंतर्गत सर्व्हेवर मागील दिवसात भाजप आणि संघ नेत्यात दिल्लीतील मॅरेथॉन बैठका पार पडल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाच तासाच्या बैठकीत सुमारे ४० मिनिटांपेक्षा अधिक वेळ संघाच्या अंतर्गत सर्वेक्षणावर झाली. संघाने हे सर्वेक्षण देशभरातील दीड डझनापेक्षा जास्त खासगी एजन्सीकडून घेतले; ज्यात संघाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. सर्वेक्षणात म्हटले आहे की; मोदींना प्रोजेक्ट केले तर याचा सर्वाधिक फायदा मध्यप्रदेश (२४ जागा), गुजरात (२३ जागा) आणि राजस्थान (२२ जागा) येथे होईल. मात्र उत्तर प्रदेशमधील ८० जागांपैकी मोदींना प्रोजेक्ट केले तर भाजपच्या १० (सध्या यूपीमध्ये भाजपचे 10 खासदार) जागांवरुन १८ पर्यंत जाऊ शकतात.

बैठकीदरम्यान संघाने काढलेल्या निष्कर्षाबाबत भाजपच्या कोणत्याही नेत्याने असहमती दर्शविली नाही. मात्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली १८० जागा मिळाल्या तरी, बहुमताला आवश्यक अशा आणखी १०० खासदारांची जुळवाजुळव सहयोगी पक्षाकडून करताना भाजपला नाकीनऊ येऊ शकते. तसेच मोदींना प्रोजेक्ट न करता भाजपने १५० जागा जिंकल्या तरी बहुमतासाठी आणखी १२०-१२५ खासदार संख्येसाठी सहयोगी पक्षाकडून मिळवणे सोपे जाईल. यात नितीश कुमार, ममता बनर्जी, जयललिता आणि नवीन पटनायक यांच्या पक्षांची मजबुरी आणि राजकीय गरज यावरही प्रकाश टाकण्यात आला.

Leave a Comment